शेतकऱ्यांची कर्जतच्या भात खरेदी केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 12:22 AM2021-01-09T00:22:44+5:302021-01-09T00:22:49+5:30

पावसाच्या भीतीने चिंता

Crowds of farmers at the Karjat paddy shopping center | शेतकऱ्यांची कर्जतच्या भात खरेदी केंद्रावर गर्दी

शेतकऱ्यांची कर्जतच्या भात खरेदी केंद्रावर गर्दी

googlenewsNext


विजय मांडे
लोकमत न्यूज नेटवर्क 
कर्जत : तालुक्यात शेतकरी सहकारी खरेदी-विक्री केंद्र कशेळे येथील आदिवासी क्षेत्रातील भात खरेदी केंद्र आणि नेरळ अशी तीन हमीभाव भात खरेदी केंद्र आहेत. यंदा कशेळे आणि नेरळ हमीभाव भात खरेदी केंद्र बंद असल्याने, तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी कर्जत भात खरेदी केंद्रावर गर्दी केल्याने या केंद्रावरील कामाचा ताण वाढला आहे. मोठ्या प्रमाणात भात खरेदी करून ठेवण्यास गोदामे अपुरी पडत असल्याने भात खरेदीला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल भात खरेदी न होता, तसाच उघड्यावर पडून आहे. त्यातच पावसाची शक्यता असल्याने भात भिजते की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.


भात खरेदी केंद्रावर भात आणून ठेवले आहे, पण खरेदीसाठी आपला नंबर लागतो की नाही? या विवंचनेत शेतकरी असून अचानक पाऊस आल्यास भाताचे नुकसान होण्याची भीतीही शेतकऱ्यांना सतावत आहे. यापूर्वी भात खरेदी केंद्राला शासनाकडून अतिरिक्त गोदामांची सोय केली जात होती. गोदामांच्या भाड्याचा भार शासन उचलत असे. मात्र, बदलत्या शासन निर्णयानुसार आता गोदाम हवे असल्यास, भात खरेदी केंद्रालाच स्वतः सोय करावी लागेल. शासन गोदामाचे भाडे देणार नसल्याने आर्थिकदृष्ट्या भात खरेदी केंद्राला हे परवडणारे नसल्याने नेरळ भात खरेदी केंद्र बंद आहे. यापूर्वी नेरळ केंद्राला शासनाने उपलब्ध करून दिलेले गोदाम परत घेतले आहे. कशेळे केंद्रात खरेदी केलेले भात ठेवण्यासाठी लागणाऱ्या बारदानाची कमतरता आहे. या कारणाने दोन्ही केंद्र बंद असल्याचे कर्जत भात खरेदी केंद्रांचे व्यवस्थापक केतन खडे यांनी सांगितले. थोडक्यात, शासनाच्या या बदलत्या निर्णयाचा फटका भात खरेदी केंद्रांना बसला आहे. कोरोनाच्या काळात शासनाने मोठ्या प्रमाणात धान्याचे वाटप केले. यामुळे बहुतांश शेतकरी आपल्याकडील सर्वच भात घरी न ठेवता हमीभाव मिळावा, यासाठी खरेदी केंद्रावर आणत आहेत. 

तालुक्यातील अन्य दोन्ही भात खरेदी केंद्र बंद असल्याने, कर्जतच्या केंद्रावर गर्दी वाढली आहे, तसेच शासनाच्या बदलत्या निर्णयामुळे गोदाम मिळण्यास अडचण येत आहे. - केतन खडे, व्यवस्थापक, खरेदी विक्री केंद्र

कर्जत भात खरेदी केंद्रावर कामगारांची कमतरता असल्याने, दिवसाला जेमतेम चारशे ते साडेचारशे पोत्याचा काटा होतो. अतिरिक्त गोदामांची सोय उपलब्ध करून सर्व शेतकऱ्यांचा भात खरेदी करावा.
                                    -दशरथ मुने, शेतकरी

Web Title: Crowds of farmers at the Karjat paddy shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.