नेरळ : कर्जत तालुक्यातील नवसाला पावणाऱ्या कोलिवली येथील सटू आईदेवीची यात्रा शुक्रवारी मोठ्या उत्सहात पार पडली. दोन दिवस उत्सहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी नवस घेण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
नेरळपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर कोलिवली गाव असून, मार्गशीर्ष अमावास्येनंतरच्या आणि पौष महिन्याच्या पहिल्याच दिवशी यात्रेचे आयोजन केले जाते. हजारो भक्तगणांनी नवस फेडण्यासाठी या जागृत सटू आईदेवीच्या यात्रेला प्रचंड गर्दी केली होती. नवस पूर्ण होताच सदर भक्तगण यात्रेचे निमित्त साधत देवीच्या चरणी आपल्या परीने योग्य ते दान धर्म करीत आपला नवस फेडतात. या यात्रेसाठी कल्याण, भिंवडी, ठाणे, पनवेल, लोणावळा आदी ठिकाणाहून आगरी, कोळी, कुणबी मराठा समाजातील लोक आपल्या घरात जन्माला आलेल्या चिमुकल्यांना घेऊन कोलिवली गावातील सटू आईचा नवस फेडण्यासाठी येत असतात. जन्माला आलेल्या बाळाचे भविष्य अधोरेखित करतात, अशी देवीभक्तांची श्रद्धा असल्याने संपूर्ण पौष महिन्यात देवीभक्त गर्दी करतात. गुरुवार, २६ डिसेंबर रोजी सटू आईदेवीची पूजा आणि पालखी मिरवणूक सोहळा पार पडला. तसेच २७ डिसेंबर रोजी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा उत्साहात पार पडली. कोलिवली गावात सटू आईच्या मूर्तीची स्थापना केली आहे. सकाळपासून दर्शनासाठी रांग लागली होती. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी आपण कोलिवली गावच्या विकासासाठी आणि यात्रेत येणाºया भाविकांची गैरसोय होणार नाही. यासाठी भविष्यात जी काही मदत लागेल, त्यासाठी सहकार्य आणि प्रयत्न करणार असल्याचे या वेळी बोलताना सांगितले.