तीन दिवसांच्या बंदनंतर कर्जत बाजारपेठेत गर्दी; कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 03:11 AM2020-07-03T03:11:45+5:302020-07-03T03:11:57+5:30
सामाजिक अंतर राखण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न
कर्जत : तालुक्यात कोरोनाचा ससेमिरा सुरू आहे. दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतच्या व्यापाऱ्यांनी २९ जून ते १ जुलै असे तीन दिवस कडकडीत बंद पाळला. मात्र, गुरुवार २ जुलै रोजी बाजारपेठ उघडल्यानंतर कर्जत बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
तालुक्यात सुरुवातीला कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता; मात्र काही दिवसांनी कोरोनाने तालुक्यात शिरकाव केला आणि हळूहळू त्याने आपला पसारा वाढवला. लॉकडाऊन काढण्यात आल्यानंतर कर्जत शहराबरोबरच तालुक्यात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. शहरालगतच्या गावांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी कर्जतच्या व्यापारी फेडरेशनने व्यापाऱ्यांची तातडीची सभा बोलावून तीन दिवस बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी बंद पाळताना जीवनावश्यक सेवा म्हणजे किराणा दुकान, दूध डेअरी, भाजीपाला, औषधांची दुकाने, दवाखाने सुरू असायचे; मात्र या बंदच्या वेळी केवळ वैद्यकीय सुविधा म्हणजे औषधांची दुकाने व दवाखानेच सुरू ठेवण्यात आली होती.
तीन दिवसांच्या बंदनंतर गुरुवार, २ जुलै रोजी बाजारपेठ उघडण्यात आली. यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मुख्य बाजारपेठेत दुचाकी, चार चाकी वाहने कशीही कुठेही उभी करण्यात येत असल्याने वाहतूककोंडी झाली होती; तर नागरिकांची झालेली गर्दी पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचाºयांनी गस्त घातली.
पोलिसांचे पेट्रोलिंग
कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचाºयांनी बाजार पेठेत पेट्रोलिंग केले. गर्दी कमी करण्याच्या सूचना देऊन कुठेही कशीही वाहने उभी करणाºयांना समज दिली. तसेच सामानाची खरेदी करताना सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन या वेळी पोलिसांनी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना के ले. दुकानदारांना नियम पाळण्याच्या सूचना के ल्या.