लॉकडाऊन शिथिल केल्याने बाजारपेठेत गर्दी; सामाजिक अंतराचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:12 AM2020-07-20T00:12:16+5:302020-07-20T00:12:51+5:30
रायगड जिल्ह्यात भाजी, किराणा दुकानांना परवानगी
अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घेण्यात आला आहे. मात्र, शनिवारी काही प्रमाणात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे रविवारी भाजीपाला, किराणा मालाची दुकाने उघल्यानंतर, काही अंशी सोशल डिस्टन्सिंग पाळत गर्दी झालेली पाहावयास मिळाली. पुन्हा एकदा नाक्या-नाक्यांवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्यामुळे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी लॉकडाऊन घोषित केले. १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते २६ जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या काळात मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत, तर किराणा, भाजीपाला, फळे, मटण, चिकन, मासळी बाजार हे पूर्णपणे बंद राहणार होते. मात्र, शनिवारी अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी नियम शिथिल करण्यात आल्याने, नागरिकांची बाजारात रविवारी गर्दी होती, तर जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांना घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्यात आली असल्याने, होम डिलीव्हरीलाही पसंती देण्यात आली.
ज्या नागरिकांकडे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला अत्यावश्यक सेवेचा पास होता, त्यांना सोडण्यात आले होते, तर ज्या नागरिकांकडे अत्यावश्यक सेवेचा पास नाही, अशांना पोलीस अडवून कारवाई करीत आहेत. आपल्यावर कारवाई होईल, या भीतीने नागरीक बाहेर पडले नव्हते, त्यामुळे जिल्ह्यातील शहरी भागात सर्वच बाजारपेठा सामसूम होत्या.मात्र, ग्रामीण भागातील दुकान सुरू होती. ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांवरून रहदारी सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती.