मुरुड, काशीदमध्ये पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:55 PM2019-11-17T23:55:03+5:302019-11-17T23:55:11+5:30
शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी काशीद व मुरुड समुद्रकिनारी गर्दी केली होती. सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यांत अवकाळी पावसामुळे पर्यटन मौसम ...
शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी काशीद व मुरुड समुद्रकिनारी गर्दी केली होती. सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यांत अवकाळी पावसामुळे पर्यटन मौसम थंडावला होता. पावसाने काढता पाय घेतल्याने पुन्हा समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत.
मुरुड व काशीद येथील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहावयास मिळत होत्या. ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावरही पर्यटकांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली.
राजपुरी नवी जेट्टी व खोरा बंदरातून पर्यटकांना जंजिरा किल्ल्यावर नेले जात होते. मुरुड, काशीद बीच पर्यटकांनी फुलून गेले होते, तर काही पर्यटक घोडागाडीतून समुद्रकिनारी सैर करण्याची मज्जा घेत होते.
एकदीड वर्षापूर्वी पुणे येथील पर्यटकांचा पॅरासिलिंगची दोरी तुटल्यामुळे मुत्यू झाला होता. तेव्हापासून चारचाकी गाडीच्या साह्याने करण्यात येणाऱ्या पॅरासिलिंगवर बंदी घालण्यात आली आहे.
पोलीस प्रशासन व महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून याबाबत विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाळूवर चालणाºया छोट्या चारचाकी गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत.