फणसाड अभयारण्यात पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 11:45 PM2019-10-12T23:45:19+5:302019-10-12T23:46:40+5:30
रानगव्यांची संख्या वाढली; पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत
संजय करडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील सुपेगाव परिसरात सुमारे ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रात फणसाड अभयारण्य विस्तारले आहे. रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडाच्या कुशीत वसलेले फणसाड अभयारण्य सध्या पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. सध्या या ठिकाणी रानगव्यांची संख्या वाढली असून पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. मात्र, त्यांचा स्थानिक शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हे रानगव्यांचे वावडुंगी, सुपेगाव, केळघर आदी भागात त्यांचे वास्तव्य दिसून येत असून, शेतात घुसल्यास संपूर्ण पिकाचा फडशा पाडत असल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
नवाब काळापासून फणसाड अभयारण्य क्षेत्र संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून या ठिकाणी वन्यजीवांचे संरक्षण व वृक्षतोडीला प्रतिबंध बसला आहे. अभयारण्यात साग व निलगिरीची झाडे असल्याने कडक उन्हातही इथले वातावरण थंड असते. या ठिकाणी ऐन, किंजळ, जांभूळ, हेड, कुडा, गेळ, अंजली, कांचन, सावर याचबरोबर सीता-अशोक, सर्पगंधा, रानतुळस, कुर्डू, कडीपत्ता, उक्षी या वनौषधीसुद्धा आढळून येतात.
च्२५ फेब्रुवारी १९८६ रोजी फणसाड वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले, तेव्हापासून येथे वृक्ष संपदा व वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी मोठी दक्षता घेतली जात आहे. जगभरात सर्वात लांब वेलींमध्ये गणली जाणारी गारंबीची वेल तसेच विविधरंगी ९० प्रजातींची फुलपाखरे या ठिकाणी आढळून येतात. यात ब्ल्यू मारगोन, मॅप, कॉमन नवाब अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आढळून येतात.
च्घुबड, तुरेवाला सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे, सातभाई, बुलबुल, हळद्या तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले हरियाल, कोकीळ असे १६४ प्रजातीचे रंगबिरंगी पक्षी येथे वास्तव्यास आहेत.
फणसाड अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, रानमांजर, बिबट्या आदी वन्यजीवांचा वावर आहे. पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार)सुद्धा येथे आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी गिधाडेही मोठ्या संख्येने आढळतात.
फणसाड अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, रानमांजर, बिबट्या आदी वन्यजीवांचा वावर आहे. पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार)सुद्धा येथे आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी गिधाडेही मोठ्या संख्येने आढळतात.