कोरोनाच्या भीतीने लसीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:22 AM2021-04-20T00:22:26+5:302021-04-20T00:22:33+5:30
महाड तालुक्यात रुग्णसंख्येत वाढ : दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीसाठी रांग
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : महाड तालुक्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाच्या भीतीने महाड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये धाव घेताना दिसून येत आहेत. मात्र लसीचा तुटवडा असल्याने नागरिकांना विनालस परत जावे लागत आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात करोनाने हाहाकार माजवला आहे. दर दिवस हा आकडा हजारोंच्या संख्येने वाढत चालला आहे. त्याचप्रमाणे महाड तालुक्यातदेखील दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. सुरवातीला लसीकरणाबाबत कोणीही गांभीर्याने विचार केला नाही. मात्र जसजशी करोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये वाढ होत गेली तशी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याने, महाड तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांनी धाव घेण्यास सुरुवात केली
आहे.
सध्या महाड तालुक्यात लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे. येणारी लस ही एक तासात संपून जात असल्याचे चित्र दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर पहावयास मिळत आहे. लशींचे शंभर डोस असताना सकाळी ७ वाजल्या पासूनच दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शेकडो लोकांच्या रांगाच रांगा लागत आहेत. डॉक्टरांच्या समोर लस किती जणांना द्यायची हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या लसीकरणामध्ये शंभर डोस असताना जवळपास तिनशे लोकांची रांग लागली होती. प्रत्येक जण आपल्याला कशा प्रकारे लस मिळेल या प्रयत्नात होता. लसीकरणासाठी महाड तालुक्यातून आणि शहरातून मोठ्या संख्येने नागरिक आल्याचे दिसून आले.
अलिबाग कार्यालयात संपर्क साधला असता सध्या लस उपलबध नाही स्टॉक शून्य आहे. आज महाड तालुक्याला मोठ्या प्रमाणात लसीची गरज आहे. करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आशा परस्थितीत महाड तालुक्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणे गरजेचे आहे.
जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याबरोबरच जास्तच जास्त लसीचा साठा महाड तालुक्याला उपलबध करून देणे तेवढेच गरजेचे आहे.
दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २२ गावांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या केंद्रावर डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग सक्षम आहे. नेटवर्कचा ही अडथळा येत नाही, लसीकरण वेगाने केले जाते त्यामुळे तालुक्यातील बहुतेक गावातील नागरिक लसीकरणासाठी दासगव प्राथमिक आरोग्य केंद्रावर येतात. महाड शहरातील नागरिकदेखील लसीकरणासाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र दर वेळी लसींचा तुटवडा निर्माण होत असल्याने शेकडो नागरिकांना परत जावे लागते. सुरुवातीपासून आतापर्यंत दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर १३५० नागरिकांना लसीकरण करण्यात आले असले तरी जवळपास ३०००हून जास्त नागरिक या केंद्रावरून लस न घेता परत गेले आहेत. तरी जिल्हा प्रशासनाने या केंद्राचा विचार करत मोठ्या प्रमाणात लस उपलबध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.