आंबोली धरणामुळे शेती बहरली, पाणीटंचाईची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:38 PM2019-05-03T23:38:52+5:302019-05-03T23:39:09+5:30

तालुक्यात चार ते पाच वर्षांपूर्वी भीषण पाणीटंचाई जाणवत होती, यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सुमारे २९ कोटी रुपये खर्च करून मुरुड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले

The cultivation of water due to the Ambaloli Dam, the problem of water shortage was overcome | आंबोली धरणामुळे शेती बहरली, पाणीटंचाईची समस्या सुटली

आंबोली धरणामुळे शेती बहरली, पाणीटंचाईची समस्या सुटली

Next

मुरुड : तालुक्यात चार ते पाच वर्षांपूर्वी भीषण पाणीटंचाई जाणवत होती, यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सुमारे २९ कोटी रुपये खर्च करून मुरुड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले. त्यानंतर पाणीटंचाई संपुष्टात आली याचबरोबर गतवर्षी शिघ्रे, उंदरगाव आणि आंबोली गाव येथील कालव्याची कामे पूर्ण झाल्याने यंदा या परिसरातील शेतीदेखील ऐन उन्हाळ्यात हिरवीगार झाली आहे.

सध्या आंबोली धरणात प्रचंड पाणीसाठा असून तीन डोंगरांच्या मधोमध हे धरण बांधल्यामुळे पावसात मोठ्या प्रमाणात पाणी सिंचन होऊन लोकांना येथून मुबलक पाणीपुरवठा होत असतो. मुरुड शहराला या धरणामधूनच पाणीपुरवठा झाल्याने मेअखेर असणारी पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. मुरुड तालुका हा नवाबकालीन तालुका असून या वेळी मुरुड शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी नवाब राजांनी बांधलेले गारंबी धरण हा शहराला एकमेव आधार देणारे धरण होते. सुरुवातीला या शहराची लोकसंख्या फक्त सात हजार होती;परंतु आता हीच लोकसंख्या १६ हजारांच्या वर पोहचली असून येथे सलग सुट्ट्या पडल्यामुळे येणारे हजारो पर्यटक व त्यांना लागणारे पाणी ही खूप मोठी गंभीर समस्या आंबोली धरणामुळे आता संपुष्टात आली आहे. त्याचबरोबर ५०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.

मुरुडमध्ये वर्षाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाच लाखांपेक्षा जास्त असून पावसाळ्यात किमान ५० हजारपेक्षा जास्त पर्यटक शनिवार, रविवार या दिवशी येथे पाहावयास मिळतात. त्यामुळे पावसाळी हंगामात आंबोली धरण हे पर्यटकांचे आकर्षण स्थळ म्हणून सर्वत्र सुपरिचित झाले आहे. आंबोली धरण ज्या वेळी पावसाळ्यात ओव्हरफ्लो होते,त्या वेळी धरणातील पाणी जाण्यासाठी जो वेगळा मार्ग बनवला आहे तेथून ते पाणी एका चौकोनी हौदात साठून त्या पाण्याचा निचरा होत असतो. साठलेल्या या चौकोनी हौदात पर्यटक पोहण्याचा आनंद लुटत असतात.

आज स्थानिक शेतकरी या धरणातील पाण्यामुळे टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, मिरची, कोथिंबीर, कांदा, वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, चहा पत्ती, नारळ, सुपारी, आंबा, कलिंगडे,आदी महत्त्वाची पिके घेऊन येथील शेतकरी सधन होताना दिसत आहे. तसेच पर्यटकांमुळे या भागातील छोट्या छोट्या खानावळ व हॉटेल हा व्यवयास सुद्धा तेजीत आला आहे. एका धरणामुळे स्थानिक शेतकरी यांच्याबरोबर पर्यटनाला चालना मिळून लोकांना आर्थिक सुबत्ता येत आहे. लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावलेला दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच या धरणापासून किमान १० किलोमीटर परिसरात असणाºया गावांना सुद्धा पाणीपुरवठा होऊन काही निवडक कालव्यांद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील काही शेतकरी दुबार शेती सुद्धा करीत आहेत. एकंदर या धरणामुळे पर्यटक व स्थानिक शेतकरी यांना मोठा दिलासा मिळून सुमारे ५० हजार लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. या धरणातील पाणी असलेल्या कालव्यांद्वारे सोडण्यात यावे जेणेकरून जिथपर्यंत कालवे आहेत तिथपर्यंत हे पाणी जाऊन जमीन ओलिताखाली येऊ शकते. तसेच पाण्याचा निचरा होऊन जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरले जाईल व त्याचा फायदा कोरड्या पडलेल्या विहिरी व कूपनलिका यांना पाणी उपलब्ध होईल. यासाठी आंबोली धरणातील पाणी सोडावे अशी मागणी येथील काही शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच नवीन कालवे काढण्यात येऊन या धरणाचे पाणी माझेरी, खोकरी, शीघ्रे, तेलवडे, वावडुंगी या मोठ्या ग्रामपंचायतींना पोहचवण्यात येऊन येथील जलसिंचन मर्यादा वाढवण्यात आल्यास येथील शेतकरी सुद्धा दुबार पीक घेण्याचा आनंद घेऊ शकतात.

Web Title: The cultivation of water due to the Ambaloli Dam, the problem of water shortage was overcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.