कोरस कंपनीतील कामगाराचे उपचारादरम्यान निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 04:53 AM2018-12-20T04:53:31+5:302018-12-20T04:53:52+5:30
पिंगळसईच्या संतप्त ग्रामस्थांचा कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर हल्लाबोल : ३ तास मृतदेह कारखान्याच्या आवारात
धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील कोरस इंडिया लिमिटेड या कारखान्यातील कामगार विजय पाशिलकर याचा मुंबईतील जसलोक इस्पितळात उपचारदारम्यान मंगळवारी रात्री मृत्यू झाला. विजय पाशिलकर हे गेली १५ वर्षे कोरस कारखान्यात काम करीत होते. कारखान्यात प्लांट नं ४ मध्ये एडीबीए, अम्ब्रोक्सील एथिलीन डायकलोराइड या रासायनाशी संपर्कामुळे त्यांना किडनीचा आजार जडला. त्यामुळे त्यांच्यावर मुुंबईत उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची किडनी निकामी झाली होती. पुढील उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी पिंगळसई ग्रामस्थांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हल्लाबोल करीत मृतदेह रुग्णवाहिकेत कारखान्याच्या आवारात ठेवला, जोपर्यंत मृताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही अशी ठोस भूमिका घेतली होती.
घरातील कर्ता पुरुष गेल्याने पाशिलकर कुटुंबीयांवर झालेल्या आघातामुळे ग्रामस्थांनी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वासमोर हल्लाबोल केला. या संदर्भात अखेर कोरस कंपनी व्यवस्थापन व ग्रामस्थांच्या समझोता, वाटाघाटीत मयत पाशिलकर यांच्या कुटुंबीयांना २१ लाख, सेवानिवृत्तीतील देयाबरोबर दोन मुलांना कारखान्यात काम देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पिंगळसई येथील स्मशानभूमीत सायंकाळी उशिरा विजय पाशिलकर यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पाशिलकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे.