रायगड जिल्ह्यात 5 जानेवारीपर्यंत संचारबंदी, काेराेना प्रसाराच्या भीतीमुळे निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 01:28 AM2020-12-26T01:28:01+5:302020-12-26T01:28:18+5:30
Raigad : खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासानाने मुरुड-जंजिरा किल्ला २५ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१ या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
रायगड : नाताळ सणाबराेबरच नव वर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्हा सज्ज झाला आहे. महानगरामध्ये सरकारने काेराेनाबाबत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यामध्ये २५ डिसेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून ते सकाळी६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. संचारबंदी ५ जानेवारी २०२१ पर्यंत राहणार आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासानाने मुरुड-जंजिरा किल्ला २५ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१ या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काहीच दिवसांपूर्वी सरकारने अनलाॅक अंतर्गत गड, किल्ले, पर्यटनस्थळे, संग्रहालये, स्मारके पर्यटनासाठी खुली करण्याचे आदेश जारी केले हाेते. मात्र ब्रिटनमध्ये नव्या रूपातील काेराेना विषाणू आढळला आहे. तसेच ताे आधीच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक वेगाने संसर्ग पसरवत आहे. त्यामुळे जगभरात काेराेनाची दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. जिल्ह्यामध्ये सध्या काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, त्याचे समूळ उच्चाटन झालेले नाही. त्यामुळे सरकार आणि प्रशासन काेणताच धाेका पत्करण्यास तयार नाही. साजरा करण्यात येणाऱ्या नाताळ आणि थर्टी फर्स्टसाठी नागरिक माेठ्या संख्येने गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने मुंबईसह अन्य महानगरीमध्ये संचारबंदी आदेश लागू केले आहेत. या कालावधीत लेट नाइट पार्टी, डिस्काे थेक, पब, रेस्टारंट, बार यांना उशिरापर्यंतची परवानगी देण्यास मज्जाव केला आहे. त्याचप्रमाणे पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र फिरण्यासही बंदी घातली आहे. त्यामुळे नाताळ आणि थर्टी फर्स्ट साजरा करताना बंधणे येणार आहेत. तरि पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.
जिल्हा प्रशासन सतर्क
महानगरात बंदी आदेश लागू असल्याने या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग वाढण्याचा धाेका लक्षात घेत जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. रायगड पाेलिसांनी दिलेल्या अहवालानुसार, मुरुड किल्ला पाहण्यासाठी पर्यटक माेठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी याबाबतचे बंदी आदेश जारी केले असल्याने पर्यटकांवर बंधने आली आहेत. जिल्ह्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंतचा संचारबंदीचा आदेश लागू केले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.