राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : ग्राहकांना योग्य सेवा देण्यासाठी महावितरण विभाग वेगवेगळ्या सुविधा देत आहे. ग्राहकांच्या असलेल्या समस्या त्वरित सुटव्यात यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी ग्राहक तक्रार निवारण दिवस महावितरण तर्फे पाळण्यात येणार आहे. अलिबाग विभागीय कार्यालयात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या बुधवारी ६ रोजी ग्राहक तक्रार निवारण दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात १६ ग्राहकांच्या समस्या महावितरण विभागाने त्वरित सोडवून दिलासा दिला आहे.
उत्तम ग्राहक सेवा देण्यावर महावितरण नेहमी तत्पर असते. वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांच्या तथा जनतेच्या तक्रारी पाहता महावितरणतर्फे आता विभागीय स्तरावर प्रत्येक महिन्यातील पहिला बुधवार हा ग्राहक तक्रार निवारण दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. नविन वीज जोडणी, वीजपुरवठा संबंधी समस्या, वीज बिलासंबंधीच्या तक्रारीचे निवारण ग्राहक निवारण कक्षात केले जाणार आहेत. सदर ग्राहक दिन प्रत्येक महीन्याच्या पहील्या बुधवारी राहणार आहे.
अलिबाग येथे कर्णिक हॉल शेजारी असलेल्या विभागीय कार्यालयात ग्राहक दिन ठेवण्यात आला होता. सकाळी ११ ते १ या कालावधीत ग्राहकांनी कार्यालयात येऊन आपल्या विजेसबंधी समस्या मांडल्या. बिल दुरुस्ती, नादुरुस्त मीटर बदली करणे अशा १६ तक्रारी ग्राहकांच्या सोडविल्या आहेत. अधिकाधिक ग्राहकांनी महिन्याच्या पहिल्या बुधवारी या ग्राहक दिनात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन अलिबाग विभागीय विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश कुमार यांनी केले आहे. अतिरिक्त अभियंता प्रशांत बानाईत, उप कार्यकारी अभियंता कमलाकर अंबाडे, सिद्धार्थ खोब्रागडे, दत्तात्रय सांगळे, उपव्यवस्थापक महेश म्हात्रे, उपविभागीय कार्यालयातील बिलिंग कर्मचारी ग्राहक यावेळी उपस्थित होते.