रेवदंडा : अलिबाग तालुक्यातील चौल टपाल कार्यालयातील इंटरनेट सेवा सुमारे १५ दिवसांपासून बंद आहे. सोमवारी टपाल कार्यालयासमोर ग्राहकांनी आत्मदहनाचा इशारा दिला, शिवाय कार्यालयीन वेळ झाली असताना उप डाकपाल हजर नसल्याने तीव्र असंतोष व्यक्त केला.
गेले १५ दिवस इंटरनेट सेवा बंद पडल्याने सर्वात जास्त त्रास हा ज्येष्ठ नागरिकांना भोगावा लागला आहे. अनेकांनी उदरनिर्वाहाच्या साधनासाठी डाकघराची सुरक्षित असलेल्या मासिक प्राप्ती योजनेत पैसे गुंतवले असून त्यांना मासिक व्याजही ऐन सणासुदीत मिळू शकलेले नाही. वित्तीय सेवा, मनिआॅर्डर, डाक जीवन विमा, हप्ता, दूरध्वनी देयके आदी सर्वच कामे बंद पडली असल्याने डाकघर ठप्प झाले आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट दिली व टपाल खात्याच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने लक्ष घालण्यासाठी प्रयत्न केले. आत्मदहनाचा इशारा दिलेल्या संजीवनी वैद्य व समीर वैद्य यांनी टपाल कार्यालयातील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. ११ आॅगस्ट पासून टपाल कार्यालयातील व्यवहार ठप्प झाल्याचे अनेकांना स्वत:ची ठेव मिळत नसल्याने औषधोपचार घेणे अनेकांना कठीण झाल्याचे सांगून व्यवहार चार दिवसांत सुरू न झाल्यास आत्मदहनाचा पर्याय स्वीकारणार असे सांगितले.दरम्यान, या संदर्भात चौलचे उप डाकपाल केसरीनाथ भगत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले ११ आॅगस्टपासून इंटरनेट सेवा बंद पडल्याने टपालखात्याचे काम ठप्प झाल्याची माहिती वरिष्ठांना कळवली असून तांत्रिक बिघाड दुरूस्तीसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे, असे सांगितले.