कोलमडणा-या इंटरनेट सेवेमुळे ग्राहक संतप्तदोन महिन्यांपासून समस्या : हजारो ग्राहकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 02:21 AM2018-01-07T02:21:36+5:302018-01-07T02:22:18+5:30
वारंवार ब्रेक होणा-या केबल्समुळे उरण परिसरात एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेचा पार बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिवसाआड इंटरनेट सेवा कोलमडू लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
उरण : वारंवार ब्रेक होणा-या केबल्समुळे उरण परिसरात एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेचा पार बोजवारा उडाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिवसाआड इंटरनेट सेवा कोलमडू लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. याचा फटका उरण तालुक्यातील जेएनपीटी, शेवा, एनएडी, जासई, उरण शहर आदी विभागातील हजारो ग्राहकांना बसला आहे. एमटीएनएलच्या गलथान कारभाराबाबत ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
खंडित झालेल्या इंटरनेट सेवेचा फटका येथील हजारो ग्राहकांबरोबरच परिसरातील अनेक महत्त्वाच्या कंपन्यांनाही बसला आहे. शासकीय कार्यालयाही सातत्याने बंद पडणा-या इंटरनेट सेवेचा फटका बसला आहे. त्याचा विपरीत परिणाम विविध शासकीय कार्यालये, बँकांच्या कामकाजावरही होऊ लागला आहे. त्याचा नाहक मनस्ताप मात्र नागरिक आणि ग्राहकांना होत आहे. याबाबत उरण एमटीएनएल कार्यालयाकडे विचारणा केली असता उरण-जासई, बेलापूर, करळ ब्रिज, उरण शहर परिसरात सातत्याने रस्त्यासाठी खोदकामे सुरू आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाच्या कामांमुळे वारंवार आॅप्टीकल फायबरच्या केबल्स तोडल्या जात आहेत. त्यामुळेच उरणमधील इंटरनेट सेवा कोलमडत असल्याची माहिती एमटीएनएलचे उरण विभागाचे डीएम एल. आर. यादव यांनी दिली. याबाबत विचारणा केली असता उरण एमटीएनएलचे अधिकाºयांकडून टाळाटाळ करण्यातयेत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी एमटीएनएलच्या कार्यालयात जावून इंटरनेट सेवाच बंद करण्याचा इशारा देवू लागले
आहेत.
वारंवार होणाºया इंटरनेट सेवा दुरुस्तीमध्ये अधिकारी वर्गालाच फारसे स्वारस्य नाही. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होण्यात कामचुकार अधिकारीच जादा जबाबदार असल्याचा आरोपही कर्मचारी वर्गातून केला जात आहे.
बोर्ली पंचतनमध्ये नेटवर्कचे तीनतेरा
दांडगुरी : तंत्रज्ञान विश्वात इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य ग्राहक मोबाइलसाठी इंटरनेटचा वापर करतात. बोर्ली पंचतन, दिवेआगर, वडवली परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच सर्व मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क खंडित होत आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे.
दिवेआगर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असून डिसेंबर, जानेवारीत हजारो पर्यटक याठिकाणी भेट देतात. मात्र सातत्याने नेटवर्क जात असल्याने पर्यटकांना व स्थानिकांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. मोबाइलचे नेटवर्क जाणे, फोन कट होणे, नेटवर्क संथ असल्यच्या अडचणी ग्राहकांना येत आहेत.
तक्र ार करायची म्हटले तरी ग्राहक सेवा केंद्रातील कर्मचाºयांकडून कोणत्याही समस्या सोडवल्या जात नाहीत. त्यामुळे जलद चालणाºया कंपनीची सेवा शहरात मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.