मधुकर ठाकूर
लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : आधी शुल्क भरा त्यानंतरच कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात करा, अशी ताठर भूमिका सीमाशुल्क विभागाने घेतल्याने कांद्याचे सुमारे ७० स्थानिक कंटेनर माघारी गेले आहेत. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ४० टक्के शुल्क भरल्यानंतर कांद्याचे ४० कंटेनर कार्गो मंगळवारी निर्यातीच्या तयारीत असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली.
केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात शुल्क थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अचानक घेतलेल्या निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी, निर्यातदार आदी सर्वजण हवालदिल झाले आहेत. शनिवारी केंद्र सरकारच्या निर्णयाआधीच जेएनपीए बंदरातच सुमारे कांद्याचे ६०-७० कंटेनर निर्यातीसाठी तयार होते, तर बंदराबाहेर परिसरातील विविध कंटेनर यार्डमध्ये राज्यातील विविध भागातून निर्यातीसाठी आलेले कांद्याचे सुमारे १२५ - १५० असे एकूण सुमारे २०० कार्गो कंटेनर शनिवारपासून अडकले आहेत. कांदा नाशवंत माल असल्याने मलेशिया, श्रीलंका, दुबई आदी देशांत पाठविण्यात येणारा सुमारे चार हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, कांदा सडून जाण्याऐवजी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी ४० टक्के शुल्क भरून कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीमाशुल्क विभागाने होल्ड करून ठेवलेले कांद्याचे २०० पैकी सुमारे ४० कार्गो कंटेनर मंगळवारी निर्यात होणार असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली.
कंटेनर कार्गो माघारी धाडले
सीमा शुल्क विभागाची इंटरनेट सेवाच मंदावल्याने शुल्क भरल्यानंतरही कांदा निर्यात करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर ४० टक्के शुल्क परवडत नसल्याने आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निर्यातीसाठी स्थानिक विभागातून आलेले कांद्याचे सुमारे ७० कंटेनर कार्गो व्यापाऱ्यांनी माघारी पाठवल्याचे बच्चूभाई ॲण्ड कंपनीचे मालक इरफान मेनन यांनी दिली.