अलिबाग-कर्जत एसटीत स्फोट घडवण्याचा होता कट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 06:37 AM2019-02-23T06:37:46+5:302019-02-23T06:38:50+5:30
पोलिसांचा तपास सुरू : आठ टीम तैनात
आविष्कार देसाई
अलिबाग : कर्जत-आपटा एसटी बसमध्ये सापडलेला जिवंत बॉम्ब हा अपघातानेच तेथे पोहोचला होता. त्याआधी बॉम्बचा प्रवास अलिबाग-कर्जत या एसटी बसने झाला होता, त्यामुळे अलिबाग-कर्जत याच एसटी बसमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट असल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी तब्बल आठ टीम तैनात केल्या आहेत.
कर्जतकडे जाण्यासाठी अलिबाग आगारातून सायंकाळी दोन गाड्या सोडतात. बुधवार, २० फेब्रुवारी रोजी आगारातून सायंकाळी ५.३० वाजता बस कर्जतकडे निघाली. ९ वाजण्याच्या सुमारास बस नियोजित स्थळी पोहोचणार होती. मात्र, ट्रफिक असल्याने उशीर झाला. कर्जतला बस पोहोचल्यावर प्रवासी खाली उतरले. त्यानंतर वाहक आणि चालक यांची दुसरी शिफ्ट होती, त्यामुळे वाहक जेवणासाठी खाली उतरला. त्यानंतर चालकाने वाहकाची तिकिटांची बॅग आणि बॉम्ब असणारी बॅग सोबत घेऊन कर्जत-आपटा या बसमध्ये ठेवली. त्यानंतर बस कर्जतहून आपट्याकडे निघाली. आपट्याला आल्यावर प्रवासी उतरले. झोपण्यासाठी वाहक चालक जाणार असल्याने त्यांनी जाण्याआधी बसमध्ये कोणाच्या वस्तू राहिल्या आहेत का? याची पाहणी केली. त्यावेळी बॉम्ब ठेवलेली बॅग सापडली.
तपासात ठेवावा लागणार संयम
अलिबाग-कर्जत या बसमध्ये बॉम्ब नेमका कोणी ठेवला? कोठे ठेवला? याचा तपास करण्यासाठी आठ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. अलिबाग-कर्जत बस साधी एसटी बस आहे, तसेच हे अंतरही खूप असल्याने ती सुमारे ४० ठिकाणी थांबते. तपास करताना संयम ठेवावा लागणार आहे. त्यामुळे कदाचित तपासाला वेळ लागू शकतो, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. चालक-वाहक यांची चौकशी करण्यात आली आहे; परंतु त्यांच्याकडूनही काही ठोस हाती लागलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागोठणे एसटी बसस्थानकात दक्षता
नागोठणे : आपटा येथील बसस्थानकात एसटीमध्ये बुधवारी सापडलेल्या स्फोटकांमुळे एसटी महामंडळाने रायगडमधील एसटी स्थानकांत दक्षता बाळगण्यास प्रारंभ केला आहे. येथील बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक भालचंद्र शेवाळे यांना विचारले असता, रोहे आगाराकडून येथे त्या संबंधीचे पत्र आले आहे. ध्वनिक्षेपकावरून वारंवार सूचना देण्यात याव्यात, असे पत्रकात स्पष्ट केल्याचे शेवाळे यांनी सांगितले. या संदर्भात नागोठणे पोलिसांनी, प्रवाशांनी जागरूक राहण्यासाठी स्थानकाच्या आवारात सूचना फलक लावण्यात येणार असल्याचे नीलेश महाडिक यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व एसटी आगारांत बसेसची तपासणी
अलिबाग : बुधवारी सापडलेल्या बॉम्बच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आठ एसटी बस आगारात येणाऱ्या आणि जाणाºया सर्व एसटी बसेसची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर बस आगारातील पब्लिक अॅड्रेस सिस्टीमद्वारे प्रवाशांना सतर्कता बाळगण्याबाबत सचूना देण्यात येत असल्याची माहिती राज्य परिवहन मंडळाच्या रायगड विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. प्रवासी सुरक्षा विषयक या नियोजनांतर्गत आगार परिसरात, बेवारस वस्तूंना हात लावू नये, बेवारस वस्तू आढळल्यास प्रवाशांनी तातडीने वाहतूक नियंत्रक, चालक वा वाहक यांना माहिती द्यावी, अनोळखी माणसाच्या काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास वाहतूक नियंत्रकांना सांगावे, अशी सूचना प्रवाशांना देण्यात येत आहेत. त्या व्यतिरिक्त वाहतूक नियंत्रकांनी दर तासाने आगार परिसरात स्वत: फिरून सुरक्षा विषयक खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे आपल्याला प्रवासादरम्यान बसायला जागा मिळावी, याकरिता एसटी बसस्थानकात आल्यावर बसच्या खिडकीतून काही सामान, बॅग, पिशवी सीटवर टाकण्याचा प्रकार घडत असतो तो प्रवाशांनी करू नये अशा सूचना दिल्या आहेत.