सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:49 AM2017-08-14T02:49:34+5:302017-08-14T02:49:38+5:30
सहजसेवा फाउंडेशन, कारमेल कॉन्व्हेंट स्कूल व खोपोली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक दिवस प्रकृतीसाठी अर्थात निसर्ग आणि स्वत:साठी’ असा संदेश देत भव्य सायकल रॅली काढण्यात आली
खोपोली : सहजसेवा फाउंडेशन, कारमेल कॉन्व्हेंट स्कूल व खोपोली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक दिवस प्रकृतीसाठी अर्थात निसर्ग आणि स्वत:साठी’ असा संदेश देत भव्य सायकल रॅली काढण्यात आली. खास करून विद्यार्थ्यांनी सहभाग घेत या अभियानाची शोभा वाढवली. स्वत:च्या, कुटुंब, परिसराच्या त्या अनुषंगाने देशाच्या आरोग्यासाठी सायकल वापरा, दररोज चालवता येत नसेल तर आठवड्यातून एक दिवस सायकल चालवा असा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
सहजसेवा फाउंडेशन नेहमीच निरनिराळ्या संकल्पना राबवत असते. आज सायकल चालवून पर्यावरणाची काळजी घेता येते असा सहज सल्ला प्रत्येक नागरिकाला देण्याच्या दृष्टीने विद्यार्थी हे माध्यम वापरले हे देखील महत्त्वाचे आहे, कारण हेच विद्यार्थी उद्याचे नागरिक होणार आहेत आणि त्यांना अशा अभियानातून प्रेरणा मिळणार आहे, असे प्रतिपादन खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजन जगताप यांनी केले. कारमेल कॉन्व्हेंट शाळेचे क्रीडा प्रशिक्षक जगदीश मरागजे आणि समीर शिंदे यांनी ही रॅली यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.
सहजसेवा फाउंडेशनचे शेखर जांभळे, गुरुनाथ साठेलकर, नकुल देशमुख, संतोष गायकर, अमित खिसमतराव, प्रल्हाद अत्रे आदींनी सहभाग घेतला. तसेच खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस राजवर्धन खेबुड, सुतार, किरण शेळके, भडाळे, बिट मार्शल हे देखील रॅलीत सहभागी झाले होते. जोरदार घोषणा देत सायकल रॅली निघाली.