रायगड : व्यायामाचे महत्त्व पटण्यासाठी सरकारकडून देशभरातील नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ हा उपक्रम रायगड जिल्ह्यात २९ आॅगस्ट रोजी सर्वत्र राबविण्यात येणार आहे.
केंद्रीय युवा व खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी पुढाकार घेऊन ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ हा नवीन उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड जिल्ह्यातील खेळ संघटना यांच्याकडून संयुक्तरीत्या २९ ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी दिली.
या उपक्रमामध्ये इच्छुक नागरिक कोठेही, कधीही धावू ,चालू शकतात किंवा सायकलिंग करू शकतात, अशी या उपक्रमामागील संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी, सायकलिंगसाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तीश: अनुकूल वेळ आणि ठिकाण निवडू शकतात. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रॅकिंग अॅप किंवा जीपीएस घड्याळाचा वापर करून धावलेल्या, चाललेल्या, सायकलिंग केलेल्या अंतराची नोंद घेता येणार आहे. अॅप वापरणे शक्य नसल्यास क्रिया पूर्ण झाल्यानंतरचा फोटो यापैकी एक संबंधित http://raigadsports.blogspot.com/ ब्लॉगवर अपलोड करावे. सर्वांनी धावणे, चालणे, सायकलिंग ही क्रिया पूर्ण केल्यानंतर दिलेल्या लिंकवरून फॉर्म भरावा.डिजिटल प्रमाणपत्र देणारउपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र http://raigadsports.blogspot.com/ या लिंकवरून ३१ ऑगस्टपासून डाऊनलोड करून घेता येईल, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.