Cyclone Nisarga: केंद्रीय पथकाने घेतला नुकसानीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:42 AM2020-06-17T00:42:51+5:302020-06-17T00:43:03+5:30

रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट; कोकणचा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर अहवाल सादर करणार

Cyclone Nisarga: Central team reviews damage | Cyclone Nisarga: केंद्रीय पथकाने घेतला नुकसानीचा आढावा

Cyclone Nisarga: केंद्रीय पथकाने घेतला नुकसानीचा आढावा

Next

- निखिल म्हात्रे 

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक मंगळवारी सकाळीच दाखल झाले होते. अलिबाग तालुक्यातील आक्षी, नागाव, सताड बंदर, चौल या ठिकाणी त्यांनी नुकसानग्रस्तांसोबत चर्चा करीत पाहणी केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीरही दिला. जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकात सहा अधिकारी असून कोकणचा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल केंद्राला सादर करणार आहेत.

संयुक्त सचिव रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर.बी. कौल, ऊर्जा मंत्रालय संचालक एन.आर.एल.के. प्रसाद, ग्रामविकास मंत्रालयाचे उपसचिव एस.एस. मोदी, कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग, वाहतूक मंत्रालय प्रमुख अभियंता अंशुमली श्रीवास्तव यांचा या पथकात समावेश होता. मुंबईतील भाऊचा धक्का येथून रो-रो बोटीने मंगळवारी सकाळी केंद्रीय पथक रायगडमध्ये दाखल झाले. या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत नुकसानाचा आढावा घेतला. त्यानंतर हे केंद्रीय पथक नागावकडे रवाना झाले.

३ जूनला निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळील मुरूड समुद्रकिनारी धडकले होते. या वादळामुळे रायगड जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये नारळी-पोफळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. तर अनेकांच्या घरावरची कौले, पत्रे उडाले आहेत. मातीच्या घरांची पडझड झाली. झाडांसह विद्युत खांबांची पडझड झाल्याने या भागातील विद्युत पुरवठादेखील खंडित झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागाची पाहणी केली. त्या वेळी रायगड जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटी रु पयांच्या तातडीची मदत दिली. मात्र, केंद्र सरकारनेदेखील कोकणातील नुकसानग्रस्त भागाला मदत द्यावी, असे म्हटले होते. तसेच खासदार सुनील तटकरे यांनीदेखील केंद्र सरकारकडे मदत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता केंद्रीय पथक रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहे. केंद्रीय पथकात असलेले सहा अधिकारी कोकणचा पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल केंद्राला सादर करणार आहेत.

गाड्यांच्या ताफ्याचे ग्रामस्थांना कु तूहल
मंगळवारी सकाळीच केंद्रीय पथकाबरोबर गाड्यांचा ताफा अलिबाग-मुरूड रस्त्यावर धावत असल्याने नागाव ते चौल पट्ट्यातले लोक कुतूहलाने या ताफ्याकडे पाहत होते.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून वाहतूक बंद होती.
त्यानंतर मंगळवारी प्रथम गाड्यांचा ताफा रस्त्यावर पाहावयास मिळाला.
तसेच आलेल्या पथकाकडून आम्हाला नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

काम सुरू असल्याने ताटकळत राहावे लागले
केंद्रीय पथक जेव्हा नागावमधील नुकसानीची पाहणी करून चौलकडे जात होते, त्या वेळी विजेचे खांब उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
ग्रामस्थांच्या मदतीने महावितरणचे कर्मचारी हे काम करत असताना रस्ता पूर्णत: बंद झाला होता. त्यामुळे केंद्रीय पथकाला काही कालावधीसाठी ताटकळत राहावे लागले.
ग्रामस्थ प्रशासनाला करत असलेली मदत केंद्रीय पथकाने पाहिली, मात्र याची नोंद त्यांनी घेतली आहे का, हे मात्र कळले नाही.

Web Title: Cyclone Nisarga: Central team reviews damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.