Cyclone Nisarga: संकटात झाले देवाचे दर्शन; पोलीस यंत्रणेसह प्रशासनाचे अभूतपूर्व काम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 12:46 AM2020-07-04T00:46:34+5:302020-07-04T00:46:45+5:30
निसर्ग चक्रीवादळाला एक महिना पूर्ण, चक्रीवादळाने रमाकांत बाळू केळस्कर (७५) यांना नगरपरिषद व कर्मचारी यांचे वेगळेच रूप अनुभवायला मिळाले.
संतोष सापते
श्रीवर्धन : सदैव सर्वसामान्य व्यक्तीच्या चर्चेचा व टीका-टिप्पणीचा विषय असलेली प्रशासकीय यंत्रणा कोरोना आणि चक्रीवादळ या दोन्ही आपत्तींमध्ये जिव्हाळा, आपुलकीची ठरलेली आहे. चक्रीवादळाच्या नंतर विविध ठिकाणी खाकीतील माणुसकीचा प्रत्यय सर्वसामान्य जनतेला आलेला आहे. आपली कर्तव्यनिष्ठा, जनतेप्रति दायित्व, आपुलकी याचे दर्शन लोकसमूहला घडलेले आहे. अनेकांनी या प्रशासकीय पोलीस यंत्रणेच्या मदतीमुळे देवाचेच दर्शन झाले असल्याची भावना व्यक्त के ली आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या यशस्वीतेनंतर त्याचे सर्व श्रेय संबंधित खात्यातील प्रमुखाच्या नावावरती जाते. मात्र, खऱ्या अर्थाने तळागाळात काम करणारी व्यक्ती ही कुठेतरी दुर्लक्षित केली जाते. शुक्रवार, ३ जुलै रोजी चक्रीवादळाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्या अनुषंगाने खºया अर्थाने चक्रीवादळामध्ये काम केलेल्या समर्पक भावनेने कार्यरत असलेल्या सर्वसामान्य व्यक्तींचा मागोवा ‘लोकमत’च्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.
३ जूनला वादळ संपल्यानंतर श्रीवर्धन पोलीस ठाण्यात निगडी येथील एका कुटुंबातील व्यक्ती वादळात भिंत पडल्यामुळे जखमी झाल्याचे सांगण्यात आले. वादळाची तीव्रता प्रचंड होती. श्रीवर्धन ते निगडी नऊ किलोमीटर अंतर आहे. मात्र, सर्वत्र रस्त्यांवर झाडांचा खच पडलेला असताना, श्रीवर्धन ठाणे अंमलदार हवालदार सुरेश भगवान माने यांनी आपली कर्तव्यनिष्ठता बजावत, स्वत:च्या दुचाकीवरून निगडीकडे मार्गस्थ झाले. मात्र, रस्त्यावर सर्वत्र झाडे आडवी पडल्यामुळे दुचाकीवरून घटनास्थळी जाणे माने यांना शक्य नव्हते. या प्रसंगी माने यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या एका बाजूला लावून ते चालत घटनास्थळी पोहोचले. चक्रीवादळाने भिंत पडून घरातील तरुण जागीच गतप्राण झाल्याचे माने यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घरातील व्यक्तींना धीर देत, त्यांचे सांत्वन करून, पंचनामा पूर्ण करून आपले कर्तव्य पार पाडले. कर्तव्याप्रति जागरूक असलेल्या माने यांची कृती प्रथमदर्शनी अतिशय साधी वाटत असली, तरीसुद्धा आपत्तीच्या काळात त्यांनी दाखविलेली समयसूचकता अतिशय समर्पक आहे.
श्रीवर्धन शहरातील दाबक पाखाडीत भास्कर माळी या व्यक्तीने आपल्या निवृत्तीच्या प्राप्त रकमेतून घराची बांधणी केलेली होती. मात्र, चक्रीवादळाने भले मोठे आंब्याचे झाड चक्रीवादळानंतर त्यांच्या घरावर पडले. भास्कर त्याच्या कुटुंबातील इतर सभासदांसोबत जीव मुठीत धरून कसेतरी घरात थांबले. मात्र, वादळ शांत झाल्यानंतर, घरावरती पडलेल्या झाडाने कुटुंबातील सर्वच व्यक्तींची तारांबळ उडवून दिली. कारण भास्कर माळीच्या घरावरती पडलेले झाड अवाढव्य होते. पडलेल्या झाडांची कटाई करून देणाºया व्यक्तीने झाड घरापासून दूर करण्यास असमर्थता दर्शविली. यावेळी हातातील काम बाजूला सारून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दोन जेसीबींच्या मदतीने हे झाड बाजूला काढले व त्यानंतर भास्कर माळी व त्याच्या कुटुंबाला निर्माण झालेल्या धोक्यापासून त्यांची सुटका केली.
पाच दिवसांनी सुटका
चक्रीवादळाने रमाकांत बाळू केळस्कर (७५) यांना नगरपरिषद व कर्मचारी यांचे वेगळेच रूप अनुभवायला मिळाले. केळकर बाबा हे कुसमा देवीच्या भागामध्ये राहतात. कुसमा देवी मंदिराच्या परिसरात चिंच, आंबा, वड व अन्य विविध जातींची झाडे रस्त्यावर उन्मळून पडलेली होती. हे वृद्ध दाम्पत्य पाच दिवस पडलेल्या झाडांमध्ये अडकून पडले होते. यावेळी नगरपरिषदेच्या वीरू वाणी, नरेश काप, बंड्या आगरकर, अमर गुरव यांच्या पथकान सर्व झाडे दूर करून केळस्करांची सुटका के ली.