Cyclone Nisarga: मदतीबाबत लवकरच चांगला निर्णय- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 11:31 PM2020-06-14T23:31:14+5:302020-06-14T23:31:32+5:30

दिवेआगरमध्ये धनादेशाचे वाटप; रायगड, रत्नागिरीतील नुकसानग्रस्तांना समाधानकारक भरपाई मिळणार

Cyclone Nisarga Good decision on help soon says ncp mp Sunil Tatkare | Cyclone Nisarga: मदतीबाबत लवकरच चांगला निर्णय- सुनील तटकरे

Cyclone Nisarga: मदतीबाबत लवकरच चांगला निर्णय- सुनील तटकरे

Next

बोर्लीपंचतन : रायगड, रत्नागिरीमध्ये चक्रीवादळाने नुकसानग्रस्त जनतेला समाधानकारक मदत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शासनाचादेखील यावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, नुकसानग्रस्त व पंचनामे झालेल्या सर्व नागरिकांना शासनाची आर्थिक स्वरूपातील मदत निश्चितपणे पोहोचेलच शिवाय भवितव्याच्या दृष्टीनेदेखील शासन लवकर चांगले निर्णय जाहीर करेल, असे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. दिवेआगर येथील चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या सात नागरिकांना मदतीचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आला, या वेळी खा. तटकरे बोलत होते.

निसर्ग चक्रीवादळामुळे श्रीवर्धन, मुरूड, म्हसळा, रोहा, महाड, अलिबाग अशा तालुक्यातील घरांचे, बागायतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने शनिवार १३ जून रोजी सायंकाळी मदतीच्या धनादेशाचे वाटप दिवेआगर येथे करण्यात आले. धनादेशाचे वाटप रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खासदार सुनील तटकरे, सरपंच उदय बापट, प्रांताधिकारी अमित शेडगे आदी उपस्थित होते. दीड लाख रुपयांचे चार जणांना तर १५ हजारांचे धनादेश तीन नागरिकांना वाटप करण्यात आले.

या वेळी पत्रकारांशी बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भागातील नागरिकांना मदत देण्याचे शासनाचे निष्कर्ष रायगडमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळातील नुकसानभरपाई देताना मोठ्या प्रमाणावर बदलावे लागत आहेत. त्यादृष्टीने सकारात्मक निर्णय शासन घेत आहे. या निर्णयामध्ये लवकरच अजूनही बदल होऊन शासनाची आर्थिक मदत पोहोचण्याचा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रीवर्धनच्या दौऱ्यावर असताना शासनावर टीका केली की, अनेक दिवस उलटूनही शासनाची मदत नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही, सरकार अपयशी ठरले आहे. याला प्रतिउत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले की, ही वेळ राजकारण करण्याची नाही, फडणवीसांनी केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे.

‘पर्यटन व्यवसायाबाबत पाठपुरावा करणार’
पर्यटन व्यवसाय हा सागरी किनारपट्टीतील जनतेचा महत्त्वाचा व्यवसाय असून आधी कोरोनामुळे तर आता चक्रीवादळामुळे पर्यटन व्यवसाय गेला असून त्यादृष्टीने ज्या नागरिकांनी कर्ज घेतले असेल अशांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी लवकरच पाठपुरावा करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्या उभारणीसाठी विशेष आर्थिक पॅकेज शासनाने देण्याबाबत प्रयत्नशील आहे. चक्रीवादळामुळे ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे व ज्यांचे पंचनामे झाले आहेत त्या सर्व नागरिकांना थोडा उशीर होईल, पण शासनाची आर्थिक मदत नक्कीच पोहोचेल असा विश्वास तटकरे त्यांनी व्यक्त केला.

मृताच्या कु टुंबीयांना धनादेश वाटप
म्हसळा : पांगळोली येथील महम्मद अब्दुल रझाक धनसे (२४) तरुणाचा ३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळात अपघाताने मृत्यू झाला.
शासन मंजूर मदतीचा चार लाखांचा धनादेश महम्मद यांचे वडील अब्दुल रझाक धनसे यांच्याकडे आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
या वेळी त्यांच्या समवेत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अलीशेट कौचाली, निवासी नायब तहसीलदार के.टी. भिंगारे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते वादळग्रस्तांना धनादेशांचे वाटप
तळा : निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आर्थिक धनादेशाचे वाटप करण्यात आले. बुधवार ३ रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तळा तालुक्याला मोठा फटका बसला.
नागरिकांनी साठविलेले वर्षभराचा अन्न धान्याचासाठा घरावरील छप्पर उडून गेल्याने वाया गेला. तसेच चक्रीवादळात शेती उध्वस्त होऊन काहींचे घर कोसळल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.
तालुक्यातील अशा नागरिकांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आर्थिक धनादेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, तहसीलदार ए. एम.कनशेट्टी, नगराध्यक्षा रेश्मा मुंढे आदी उपस्थित होते.

साडेपाच लाखांच्या आर्थिक मदतीचे वाटप
रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीतील मधुकर कृष्णा शिंदे १ लाख ५६ हजार, अमित नारायण पवार ३० हजार २००, विलास तुकाराम कोल्हटकर १ लाख ६० हजार, सुरेंद्र जनार्दन साठेकर १ लाख ६० हजार, ज्योती जनार्दन धुमाळ ८४ हजार ६०० असे एकूण ५ लाख ९० हजार ८०० रुपयांच्या मदतीचे धनादेश रविवारी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या वेळी प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, कृषी अधिकारी अशोक महामुनी, विस्तार अधिकारी महारुद्र फरतडे उपस्थित होते.

Web Title: Cyclone Nisarga Good decision on help soon says ncp mp Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.