रायगड : तौक्ते वादळामुळे जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, म्हसळा आणि पोलादपूर तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. विजेच्या खांबाची हानी झाल्याने अद्यापही 661 गावे अंधरात आहेत. सुमारे पाच हजार हेक्टरवरील आंबा, नारळ आणि भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ही प्राथमिक माहिती असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नुकसानी आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी जिल्ह्यात थैमान घालत ते सायंकाळी गुजरात राज्याकडे सरकले. तत्पूर्वी वादळामुळे जिल्ह्यात विविध स्तरावर हानी झाली आहे. वादळामुळे जिल्ह्यातील चार नागरिकांचा जीव गेला आहे, तर सात नागरिक जखमी झाले. 6026 घरांची अंशता पडझड झाली, तर 10 घरे पूर्णतः उध्वस्त झाली. 168 उच्च दाब खांबाचे तर 426 कमी दाबाच्या खांबाचे नुकसान झाले. 12 विद्युत जनित्र कोलमडून पडल्याने जिल्ह्यातील 661 गावांमध्ये अंधार असल्याने एक लाख सहा हजार नागरिक प्रभावित झाले आहेत.
या कालावधीत मासेमारी नौकांना समुद्रामध्ये मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे बहुतांश नौका या किनारी होत्या. वादळामुळे 10 बोटींचे तर 12 मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाले आहे.गेल्या तीन दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे फळ झांडाचे कमी परंतू फळांचे नुकसान झाल्याने बागायतदार हवालदील झाले आहेत.
नुकसानीचे पंचनामे सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे किती रुपयांचे नुकसान झाले हे पंचनामे पूर्ण झाल्यावरच कळणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, पंचनामे करण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.