अलिबाग : अहमदाबाद येथे पार पडलेल्या ५० किमी शुगर फ्री सायक्लोथॉन स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील धोकवडे गावची चैताली शिलधनकर ही प्रथम आली असून तिने अलिबागसह रायगडचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत देशभरातून दोन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. चैतालीने ही स्पर्धा १ तास ३५ मिनिटांत पूर्ण केली.
अहमदाबाद येथे १६ फेब्रुवारी रोजी शुगर फ्री कंपनीतर्फे सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित केली होती. ५० किमीच्या नॉन गियर आणि गियर या दोन स्पर्धा कंपनीने घेतल्या होत्या. चैताली ही नॉन गियर स्पर्धेत सहभागी झाली होती. २५ किमीचे दोन लॅप होते. चैतालीसोबत देशभरातील ६० स्पर्धक सहभागी झाले होते. या साठ स्पर्धकांमधून चैताली हिने प्रथम क्र मांक प्राप्त के ला. चैताली हिला २० हजार रोख रक्कम, पदक असे पारितोषिक देण्यात आले.चैताली ही दहा वर्षांपासून सायकल स्पर्धेत सहभागी होत असून लहानपणापासून ती सायकल चालवीत आहे. चैताली हिने याआधी गुजरात येथे ११५ किमी, बंगलोर ५० किमी, इंदोर ५० किमी, पंजाब ५० किमी स्पर्धेत सहभाग घेतला होता. अनेक स्पर्धांत तिने आतापर्यंत अनेक पारितोषिके जिंकली आहेत. आई, वडील, मित्र निकेत पाटील यांचे तिला नेहमीच प्रोत्साहन मिळाले आहे. चैताली ही बेलापूर येथील डीकॅथलॉन या कंपनीत काम करीत असून आपल्या सायकल खेळालाही तेवढेच महत्त्व देत आहे.