दादली, टोळ पूल धोकादायक, जिल्हाधिकाऱ्यांकडून वाहतूक बंदी अधिसूचना लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:26 AM2018-12-08T00:26:54+5:302018-12-08T00:27:02+5:30
रायगड-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारे सावित्री नदीवरील दादली व टोळ हे दोन्ही पूल कमकुवत झाले आहेत
- जयंत धुळप
अलिबाग : रायगड-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारे सावित्री नदीवरील दादली व टोळ हे दोन्ही पूल कमकुवत झाले आहेत, त्यामुळे त्यावरील अवजड व वेगवान वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार दोन्ही पुलांवरून केवळ २० मे. टन वाहतूक प्रतितास २० कि.मी. या वेगानेच करावी लागणार आहे.
गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश शासनाने दिले होते, त्यानुसार टोळ पुलाचे १८ जुलै २०१८ रोजी केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटनुसार पुलाचे बेअरिंग पूर्णपणे खराब झाले आहेत, तसेच पूल पिलर्सच्या पाण्यातील बांधकामाला उभ्या भेगा पडल्याने पूल कमकुवत झाला आहे. अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, असा अहवाल अधीक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ (पूल) कोकण भवन, नवी मुंबई यांनी दिला आहे. तर दादली पुलाच्या पाहणीत, पूल पिलरच्या फाउंडेशन व नदीतळात पोकळी निर्माण झाली आहे. परिणामी, हा पूलदेखील कमकुवत झाला असून अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वाहूतक बंदी अधिसूचना जारी केली असून, ती शासन राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. सावित्री नदीवरील मांदाड-महाड-विसापूर रस्त्यामधील दादली पूल (लांबी १२०.५० मीटर) तसेच वीर-टोळ, आंबेत, बागमांडला रस्त्यावरील टोळ पूल (लांबी १५८ मीटर) हे कमकुवत झाले आहेत, असा अहवाल अधीक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ (पूल) कोकण भवन, नवी मुंबई यांनी तांत्रिक पाहणी व स्ट्रक्चरल आॅडिट करून दिला आहे.
पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकाºयांची मागणी
पुलांवरील अवजड वाहतूक बंद करून फक्त २० मे. टनपर्यंत वजनाची वाहतूक प्रतितास २० मि. मी. इतक्या धिम्या गतीने वेगाने चालू ठेवण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांना सूचित केले आहे. या बाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी रायगड जिल्हाधिकाºयांना कळविले आहे.
या संदर्भात रायगड जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दादली पूल व टोळ
पूल या दोन्ही पुलांवरून अवजड व वेगवान वाहतूक बंद करण्याचे
आदेश देऊन वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.
>३४ वर्षांपूर्वीचे पूल
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांना जोडण्यासाठी बॅ. ए. आर. अंतुले यांनी ३४ वर्षांपूर्वी ते मुख्यमंत्री असताना महाड तालुक्यातील टोळ, दादली आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत या तीन पुलांची उभारणी केली होती.
प्राथमिक सर्वेक्षणानंतर हे
तिन्ही पूल धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल कमकुवत झाल्याचा सूचनाफलक लावण्याने प्रवासी व वाहनधारकांमध्ये मोठी खळबळ माजली होती.