वडखळमध्ये लाखमोलाच्या दहीहंडीचे आकर्षण; विद्यार्थ्यांनी फोडली ज्ञानाची दहीहंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:20 AM2019-08-24T00:20:08+5:302019-08-24T00:20:42+5:30
वडखळसारख्या मध्यवर्ती ठिकाणी ही दहीहंडी बांधण्यात येणार असल्याने ही दहीहंडी फोडण्याचे थेट निमंत्रण युगंधर सामाजिक संस्थेने गोविंदा पथकांना केले आहे.
पेण : वडखळ येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युगंधर सामाजिक संस्था वडखळ व जेएसडब्लू स्टील कंपनी यांच्या विद्यमाने वडखळ नाक्यावर गोविंदा मंडळांसाठी १ लाख ११ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली दहीहंडी पेणमध्ये आकर्षण ठरणार आहे.
वडखळसारख्या मध्यवर्ती ठिकाणी ही दहीहंडी बांधण्यात येणार असल्याने ही दहीहंडी फोडण्याचे थेट निमंत्रण युगंधर सामाजिक संस्थेने गोविंदा पथकांना केले आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेश मोकल यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. कार्यक्रमांसाठी जेएसडब्लू प्रेसिडंट जी. एस. राठोड, जनरल मॅनेजर नारायण बोलबंडा, जनरल मॅनेजर आत्माराम बेतकेकर, जनरल मॅनेजर बळवंत जोग व जनरल मॅनेजर विनायक दळवी अशा विविध विभागांचे कंपनीतील मान्यवर या दहीहंडीच्या उत्सवप्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरू आहे.
बोर्ली-पंचतनमध्ये ११५० दहीहंडी फुटणार
बोर्लीपंचतन, वडवली, वेळास, दिवेआगर गावांत विशिष्ट आडनावावरून असलेली खोती वा कंपनी ही गुण्या गोविंदाने दहीहंडीचा उत्सव करतात. परंपरेनुसार गावात प्रत्येक खोतीची वेगळी फळी असते. यात खोतीतील ज्येष्ठ व्यक्ती मिरवणुकीत सर्वात पुढे असते. येथे दोरीवर लटकलेल्या दहीहंडीपेक्षा नारळ-पोफळीवर टोकाला लावलेल्या दहीहंडी फोडायला तरुणांची झुंबड पाहायला मिळते.
तालुक्यात श्रीवर्धन व दिघी दोन पोलीसठाणी आहेत. दिघी सागरी पोलीसठाण्या अंतर्गत ३५ सार्वजनिक दहीहंडी व १११५ खासगी दहीहंडी आहेत. तालुक्यात एकूण ११५० दहीहंडी शनिवारी फुटणार आहेत. सणाच्या आनंदाला गालबोट लागू नये म्हणून पोलीस काळजी घेत आहेत, तर नागरिकांनी शांततेत सण साजरे करावेत, असे आवाहन दिघी पोलीस ठाण्याचे अधिकारी एम. आर. शेलार यांनी केले. हरिकीर्तन, भजन, नृत्य असे अनेक कार्यक्रम बोर्ली-पंचतन येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव ठिकाणी दोन दिवस होताना दिसतात.