खड्ड्यांमुळे दहिवली पुलाची झाली चाळण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 01:58 AM2018-08-25T01:58:48+5:302018-08-25T01:59:11+5:30
चालकांसह प्रवासी हैराण; वाहनांच्या दुरूस्तीचा खर्च वाढला
- कांता हाबळे
नेरळ : कर्जत तालुक्यातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दररोज कुठे ना कुठे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. नेरळ-कळंब रस्त्यावरील दहिवली पुलाची अक्षरश: चाळण झाल्याने वाहन चालवायचे कसे? आणि कोणता खड्डा चुकवायचा? असा प्रश्न चालकांना पडला आहे.
नेरळ-कळंब हा महत्त्वाचा वर्दळीचा मार्ग समजला जातो. याच रस्त्यावरून कर्जत तालुक्यातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. मात्र, डांबर कमी आणि खड्डेच जास्त असलेल्या या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लावत आहे.
खड्ड्यांमुळे वाहनांच्या दुरु स्तीचा खर्चही वाढत आहे. महिन्याभरापूर्वी नेरळ-कळंब रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले होते. मात्र, निकृष्ट कामामुळे रस्त्याची अवस्था जैसे थे झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. याच रस्त्यावरील बिरदोले गावाजवळ पडलेल्या खड्ड्यांत अनेक अपघात झाले आहेत. येथे मोऱ्या टाकण्यासाठी पाइपही आणण्यात आले होते, परंतु दीड महिना उलटूनही अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. दहिवली पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात पुलावरून पाणी जाते. यंदा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. याबाबत तक्रार करूनही बांधकाम विभागाच्या अधिकाºयांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. खड्ड्यांमध्ये वाहने आदळत असल्याने पुलाला हादरा बसून पूल कमकुवत होत आहे. पूल कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. शिवाय ४० ते ५० गावांचा संपर्क तुटण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पुलाची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी चालकांसह स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
पुलाची उंची वाढविण्याची मागणी
नेरळ-दहिवली पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पुलावरून पाणी जाते आणि अनेक गावांचा संपर्क तुटतो, तसेच पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात, तसेच संरक्षक कठडे पाण्याच्या प्रवाहात वाकतात तर काही रेलिंग वाहत जातात. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, प्रवासी व वाहनचालकांकडून केली
जात आहे.