इंग्लिश स्कूलमधील अॅडमिशनच्या पैशावर चोरट्याने मारला डल्ला
By निखिल म्हात्रे | Published: May 9, 2024 08:54 PM2024-05-09T20:54:21+5:302024-05-09T20:54:39+5:30
अलिबाग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग - शहरातील के.ई.एसची नमिता नाईक इंग्लीश मिडीयम प्रायमरी स्कुलमध्ये चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने शाळेच्या कार्यालयातील कपाटात ठेवलेले अॅडमिशनचे १ लाख ९२ हजार ४५० रुपये चोरून नेले आहेत. या चोरट्याने विद्येच्या मंदीरातच चोरी केल्याने शहरात दिवसभर चर्चेचा विषय ठरला होता. या बाबत अलिबाग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २ मे २०२४ पासुन के.ई.एसची नमिता नाईक इंग्लीश मिडीयम प्रायमरी स्कुलमध्ये प्ले ग्रुप ते इयत्ता १२ वी पर्यत अॅडमिशन सुरु आहे. दररोज होणाऱ्या अडमिशनचे पैसे बँकेमध्ये भरणा होत असे, मात्र बुधवार दिनांक ८ मे २०२४ रोजी शाळेमध्ये झालेल्या अॅडमिशनचे पैसे उशिर झाल्यामुळे शाळेतील कर्मचारी यांनी बँकेत न भरता कार्यालयातील कपाटामध्ये ठेवले होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सर्व कपाट, दरवाजे लॉक करून घरी निघुन गेले होते. गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शाळेच् आॅफीस उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना दरवाजाचे लाॅक तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. हि बाब लक्षात येताच पोलिस ठाण्यात धाव घेत, घडलेल्या घटनेची फिर्याद दाखल करण्यात आली.
या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी तपासाच्या कामासाठी पोलिसांचे श्वान पथक दाखल झाले होते.