कर्जत : तालुक्यातील कोंढाणे धरणाचे पाणी सिडकोला देण्याचा निर्णय युती सरकारच्या काळात घेण्यात आला होता. मात्र हा निर्णय कर्जत तालुक्यातील जनतेवर अन्याय करणारा आहे. कोंढाणे धरण झालेच पाहिजे, पण ते आमच्यासाठीच.. अन्यथा कोंढाणे धरण प्रकल्प संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. त्या वेळी मी सर्वात पुढे असेन. मात्र कोणत्याही परिस्थितीत सिडकोला जागेची मोजणी करू देणार नाही, असा इशारा कोंढाणे धरण संघर्ष समितीचे निमंत्रक माजी आमदार सुरेश लाड यांनी दिला.आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कोंढाणे धरण संघर्ष समितीचे निमंत्रक आणि कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या आवाहनानुसार खांडपे येथील गीता घारे इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात बैठक आयोजित केली होती. लाड म्हणाले, ‘मी आमदार असताना नवी मुंबईसाठी चावणी येथे धरण व्हावे यासाठी आग्रही होतो. परंतु त्या वेळी राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारने जाणीवपूर्वक त्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. असा आरोप करून कोंढाणे येथील धरण ही कर्जत तालुक्याची गरज असून कर्जत तालुक्यात होत असलेल्या नवीन वसाहती आणि स्थानिक यांच्यासाठी हे आवश्यक आहे. आता आपण या आठवड्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून कोंढाणे धरणाची गरज तालुक्यासाठी लक्षात घेऊन धरण सिडकोला देऊ नये आणि शासनाने धरण सिडकोला देण्याचा निर्णय रद्द करावा, ही मागणी करणार असल्याचे सांगितले.यापुढे शासनाने निर्णय जाहीर करेपर्यंत सिडकोचा एकही अधिकारी धरण परिसरात मोजणी करण्यासाठी दिसल्यास कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल, पण आपण मोजणी होऊ देणार नाही. त्यांना यापुढे या परिसरात नो एन्ट्री असेल. यापुढे कोंढाणे धरण कर्जत तालुक्यासाठी झाले पाहिजे आणि ते दुसऱ्यासाठी नसेल हे मात्र पक्के.’तानाजी चव्हाण यांनी प्रास्ताविक करताना कोंढाणे धरणाची पार्श्वभूमी सांगून कोणत्याही स्थितीत हे धरण सिडकोला दिले जाऊ नये. यासाठी आंदोलन उभे केले जाणार असून, त्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. सुनील गायकवाड यांनी, आपल्या परिसरात आधीच पाण्याची टंचाई असते. परंतु कातळदरा भागातील पाणी येथून वाहत असल्याने आम्ही नदीमध्ये पावसाळ्यानंतर दोन महिने पाणी तरी बघतो. हे धरण आमच्यासाठीच झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्व जण एकत्रित लढा देऊ, असे सांगितले.बैठकीला रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, प्रदेश प्रतिनिधी भगवान भोईर, तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड, माजी नगराध्यक्ष शरद लाड, राष्ट्रवादी शेकापचे सुधीर कांबळे, पंचायत समिती सदस्य रवींद्र देशमुख आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोंढाणे धरण झालेच पाहिजे, पण आमच्यासाठीच... अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 12:48 AM