धरणाच्या बाजूचा पूल तयार, मात्र वाहतूक बंदच; स्थानिकांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:35 PM2020-08-28T23:35:21+5:302020-08-28T23:35:43+5:30

सात आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना मारावा लागतो लांबचा फेरा

Dam side bridge built, but traffic closed; The displeasure of the locals | धरणाच्या बाजूचा पूल तयार, मात्र वाहतूक बंदच; स्थानिकांची नाराजी

धरणाच्या बाजूचा पूल तयार, मात्र वाहतूक बंदच; स्थानिकांची नाराजी

googlenewsNext

नेरळ : मार्च, २०१८ मध्ये कोसळलेला नेरळ गणेशघाट आणि ब्रिटिशकालीन धरण येथील पूल एक महिन्यांपूर्वी तयार झाला आहे. मात्र, ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे या पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकली नाही. नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील मोहाचीवाडी, तसेच आजूबाजूच्या सात वाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी नागरिकांनी कामाच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यात नेरळ येथे ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली माथेरानच्या डोंगरातून वाहत येणाºया ओहोळावर असलेला पूल मार्च, २०१८ मध्ये कोसळला होता. तेव्हापासून त्या पुलाचा वापर करणारे नेरळ ग्रामपंचायतीमधील मोहाचीवाडी, तसेच सात आदिवासी वाड्यांमध्ये राहणारे लोक चार किलोमीटरचा फेरा मारून घरी जात आहेत. या पुलाची पुन्हा उभारणी व्हावी, यासाठी नेरळ ग्रामपंचायत आणि स्थानिक रहिवासी दीड वर्षे पाठपुरावा करीत होते. स्थानिकांना पुलावरून होणारी वाहतूक बंद झाल्याने करावी लागणारी पायपीट यामुळे कंटाळले असून, त्यांना मोहाचीवाडी गावातून कल्याण रस्त्याने येऊन नेरळ बाजारपेठेत जावे लागत आहे. दोन पावसाळे होत आले असून, पुलाचे काम पूर्ण झाले नाही. तब्बल दोन वेळा पुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन नारळ फोडले गेले आहेत. मात्र, लॉकडाऊन काळात पुलाचे बांधकाम सुरू झाले, पण चार महिने होऊनही पुलाचे काम अपूर्णच आहे. त्यात मागील दीड महिन्यांपूर्वी पुलावरील स्लॅब टाकून झाला असून, पुलावरून वाहतूक मात्र सुरू केलेली नाही. दोन्ही बाजूला असलेला रस्ता जोडण्याचे काम जेमतेम दोन दिवसांत पूर्ण होणारे आहे. मात्र, ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे पुलाच्या दोन्ही बाजू जोडल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे पुलावरून वाहतूक सुरू झालेली नाही.

परिणामी मोहाचीवाडीपासून सात आदिवासी वाडीमधील लोकांना पुलाअभावी चार किलोमीटरचा फेरा मारून घरी किंवा बाजारपेठेत यावे लागते आहे. मानवाधिकार आयोगाचे गोरख शेप यांनी गेली दोन वर्षे या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला असून, त्यांनी मोहाचीवाडी ग्रामस्थ आणि आदिवासी लोकांना एकत्र करीत रायगड जिल्हा परिषदेत जाऊन पुलाच्या कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी करीत होते.

पुलाच्या कामासाठी
४० लाखांचा निधी
नेरळ विकास प्राधिकरणकडून या पुलाच्या कामासाठी ४० लाखांचा निधी प्राप्त झाला होता आणि त्या निधीमधून पुलाचे काम पूर्ण केले जात आहे. मात्र, दोन्ही बाजू जोडण्याचे काम चार दिवसांत झाले, तर मोहाचीवाडी आणि पुलाचा वापर करीत असलेल्या आदिवासी वाड्यांना नेरळ गावात येणे सोयीचे होऊ शकते. याबाबत नेरळ विकास प्राधिकरणकडे माहिती घेतली असता, प्राधिकरणचे शाखा अभियंता नाही? याबाबत कोणतीही माहिती देत नाहीत.

Web Title: Dam side bridge built, but traffic closed; The displeasure of the locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.