पालीत अंबा नदीवरील बंधाऱ्याची दुरवस्था; पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 05:09 AM2019-12-06T05:09:24+5:302019-12-06T05:09:38+5:30
हा बंधारा अनेक ठिकाणी तुटलेला होता. याची कोलाड पाटबंधारे विभागाकडून मागील वर्षी डागडुजी करण्यात आली होती.
- विनोद भोईर
पाली : संपूर्ण पाली शहराला व पाली ग्रामपंचायत हद्दीतील गावांना येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा होतो. येथून जवळच असलेल्या बलाप गावाजवळ अंबा नदीचे पाणी अडविण्यासाठी के.टी. बंधारा आहे. तेथे अंबा नदीचे पाणी अडवून साठविले जाते. या के.टी. बंधाºयामुळेच पालीवासीयांना पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सद्यस्थितीत हा बंधारा पूर्णपणे मोडकळीस आला असून, लवकर दुरुस्ती न केल्यास पालीकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढावेल.
हा बंधारा अनेक ठिकाणी तुटलेला होता. याची कोलाड पाटबंधारे विभागाकडून मागील वर्षी डागडुजी करण्यात आली होती. या डागडुजी करण्यास बराच खर्चही आला होता. त्या वेळी हा के.टी. बंधारा काही प्रमाणात पूर्वस्थितीत आला होता. मात्र, दुरुस्ती करून एक वर्ष होत नाही, तोच पुन्हा हा बंधारा मोडकळीस येऊन त्याची दुरवस्था झाली आहे.
अनेक ठिकाणी स्लॅब तुटला आहे. त्यातून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. बंधाºयाला आधार देणारे दगडी खांब मोडकळीस आले आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात कचराही साठला आहे. अशाच परिस्थितीत हा बंधारा राहिल्यास पाणीगळती होऊन पाली शहरावर पाण्याचे संकट येऊ शकते. यामुळे या बंधाºयाची लवकर दुरस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रवास करणे धोकादायक
आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांचे या बंधाºयावर येणे-जाणे सुरू असते. हा बंधारा रहदारीसही वापरला जातो. तुटलेला असल्याने येथून ये-जा करणे धोकादायक आहे.
त्यामुळे एखादा अपघातही होऊ शकतो. त्यामुळेच अतिशय उपयोगी असलेल्या या बंधाºयाकडे पाटबंधारे विभागाने व पाली ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
अन्यथा, पालीवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. हा प्रश्न लवकर सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बलाप येथील के.टी. बंधारा नादुरुस्त झाला आहे. तो तातडीने दुरुस्त व्हावा, म्हणून आम्ही कोलाड पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.
- गणेश बाळके,
सरपंच, पाली
वारंवार तक्रार करूनही या बंधाºयाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या बंधाºयावरून लोक पायी ये-जा करतात; त्यामुळे दुर्घटना होण्याचीही भीती आहे. त्यामुळे लवकर या बंधाºयाची दुरुस्ती करण्यात यावी.
- किशोर खरिवले, उपसरपंच, बलाप
आगामी चार ते पाच दिवसांमध्ये के.टी. बंधाºयाची डागडुजी करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
- राजेंद्र मोहरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पाटबंधारे विभाग, कोलाड