अवकाळी पावसाने बागायतदारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 12:37 AM2021-05-06T00:37:51+5:302021-05-06T00:38:03+5:30
मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्याने जि. प. शाळा परसुले शाळेचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. २५० पत्रे व लोखंडी कैचीसह पाईप व भिंती जमीनदोस्त झाल्या आहेत
लाेकमत न्यूज नेटवर्क
पोलादपूर : एप्रिल, मे महिना चालू झाला की शेतकरी आपली शेतीची कामे उरकती घेत असतो. यावेळी लागणारा लाकूडफाटा, वैरण, आदी शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी जमा करण्यात शेतकरी मजूर मश्गुल असतानाच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या अगोदर नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पोलादपूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी घरांची कौले, पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. परसुळे येथील रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जमीनदोस्त होऊन पत्रे व इतर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्याने जि. प. शाळा परसुले शाळेचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. २५० पत्रे व लोखंडी कैचीसह पाईप व भिंती जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच किचन शेड, शौचालय, पिण्याच्या पाण्याची टाकी, ध्वजस्तंभ व हँडवॉश स्टँड याचेही पूर्ण नुकसान झाले आहे. यानंतर सर्व ग्रामस्थ व मुख्याध्यापक कळंबे तसेच ग्रामसेवक करमत यांनी तातडीने येऊन पत्रे उडालेल्या खोलीमधून सर्व साहित्य इतरत्र हलविले. त्याचप्रमाणे गावातील जितेंद्र जाधव यांच्याही घराचे पत्रे उडाले आहेत.अचानक आलेल्या मुसळधार पावसाने तसेच वादळी वाऱ्याने नुकत्याच आलेला आंब्याच्या बागांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात आंबा जमिनीवर कोसळला. शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.
गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न
पोलादपूर तालुक्यातील ढवळे भागात सोमवारी तसेच मंगळवारी पुन्हा दुपारनंतर पावसाने दमदार पर्जन्यवृष्टी केली आहे. कशेडीसह इतर विभागात वाऱ्याचा तडाखा बसल्याने आंबे गळून पडले आहेत. त्यातच जनावरांचा चारा भिजल्याने त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील ढवली, कामथी, सावित्री विभाग, कापडे, वाकण, बोरावलेसह विविध गावांतील शेतकऱ्याच्या आंबा बागायतीला पावसाचा फटका बसला आहे.