बोर्ली-मांडला : मुरुड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत हद्दीतील इम्रान (राजू) दळवी यांच्या मालकीच्या तळवली येथील सुमारे १३ एकर बागायतीमध्ये कोणीतरी लावलेल्या वणव्यात कुंपणासह लहान-मोठ्या बाजत्या आंब्याची झाडे होरपळून नुकसान झाले. याबाबत त्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुरुड तालुक्यातील मांडला ग्रामपंचायत हद्दीतील तळवली येथील मालकीच्या १३ एकर क्षेत्रावर लहान व मोठी अशी ५०० आंब्याची झाडे असून ही बागायत माझ्या मालकीची व कब्जेवहिवाटीची असून, यंदा आंबा पीक घेण्यासाठी चेहेर येथील ग्रामपंचायत सदस्य नीलेश चवरकर यांना करारावर दिली आहे. त्यांनी या जागेला कुंपण घालण्यात येऊन झाडांवर औषध फवारणी व मशागत करून आंबा मोहोराला सुरुवात झाली होती.
या आंबा बागायतीला २० जानेवारी रोजी कोणीतरी लावलेल्या वणव्याचा फटका बसला असून कुंपणासह लहान-मोठ्या २८ झाडांचे वणव्याने होरपळून नुकसान झाले आहे, असे इम्रान दळवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या बागेची पाहणी करण्यात येऊन रीतसर पंचनामा करण्यात यावा व योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मुरुड तालुका कृषी विभागाचे कृषी सहायक ए. जी. उपाध्ये यांनी नुकतीच वणवाग्रस्त बागायतीला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. लवकरच रीतसर पंचनामा करण्यात येऊन पुढील कार्यवाहीसाठी तालुका कृषी अधिकारी यांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.