वाहकाच्या मनमानीमुळे तरुणीला नाहक त्रास, कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:23 AM2017-08-28T04:23:48+5:302017-08-28T04:24:07+5:30
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रोहे आगारातील पुणे-रोहा या निमआराम एसटी बसच्या बेजबाबदार वाहकाच्या मनमानीमुळे पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या नागोठण्यातील महाविद्यालयीन तरुणीला..
नागोठणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रोहे आगारातील पुणे-रोहा या निमआराम एसटी बसच्या बेजबाबदार वाहकाच्या मनमानीमुळे पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या नागोठण्यातील महाविद्यालयीन तरुणीला नाहक त्रास झाल्याची तक्र ार या युवतीच्या पालकांनी नागोठणे बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकांकडे केली आहे.
नागोठणेतील योगेश कदम यांच्या पुणे येथे शिकणाºया मुलीला नागोठणे येथे यायचे होते, त्यासाठी चिंचवड बसस्थानकात दुपारी १२.३० वाजता पुणे-रोहे या निमआराम एसटी बसचे आॅनलाइन आरक्षण केले होते. संबंधित युवती १२ वाजता चिंचवड स्थानकात हजर झाली होती. मात्र, १२.३०ची गाडी ३.३० वाजता या स्थानकात आली. तीन तास गाडीची वाट बघत असलेली युवती गाडीत बसल्यानंतर वाहका(बॅच नंबर ३३१६६)ला आपल्याकडे असणारे आगाऊ आरक्षण दाखविले, तेव्हा वाहकाने ओळख म्हणून तिच्याकडे आधार कार्डची मागणी केली. सदरील युवतीने आपल्या मोबाइलमधील आधार कार्ड दाखविले तेव्हा हे चित्र चालणार नसून ओरिजनल दाखव, नाही तर तिकीट काढण्यास सांगितले. तिने पुणे महानगर परिवहन महामंडळाचे ओळखपत्र दाखविले. तेव्हा असले ओळखपत्र चालणार नसून तिकीट काढावे लागेल, नाहीतर खाली उतर, असे सांगून अरेरावी केली. त्यामुळे घाबरलेल्या युवतीने आपल्या पर्समध्ये असलेल्या सर्व पैशांमधून खोपोलीपर्यंतचे तिकीट काढले आणि घडलेल्या प्रकाराची पालकांना माहिती दिली.
गाडी खोपोलीला आल्यानंतर सदरील वाहकाने तिकीट काढ नाहीतर बसमधून खाली उतर, असे सांगितले. त्या वेळी युवतीने खाली उतरणार नाही, असे सांगितले. त्या वेळी वाहकाने सदरील युवतीला खोपोली बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकांकडे नेले. युवतीने पुणे परिवहन महामंडळाचे ओळखपत्र दाखविले. ते ओळखपत्र चालेल, असे वाहतूक नियंत्रकांनी सांगितले.