हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा, वडपाले गावातील स्थिती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 07:06 AM2018-05-07T07:06:39+5:302018-05-07T07:06:39+5:30
राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. मात्र, तरीही उन्हाळ्यात या परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवते. रायगड जिल्ह्यातील अनेक गावे सध्या पाणीटंचाईने व्याकूळ झाली आहेत. माणगाव तालुकाही याला अपवाद नाही. तालुक्यातील वडपाले गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
- गिरीश गोरेगावकर
माणगाव : राज्यात सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. मात्र, तरीही उन्हाळ्यात या परिसरात भीषण पाणीटंचाई जाणवते. रायगड जिल्ह्यातील अनेक गावे सध्या पाणीटंचाईने व्याकूळ झाली आहेत. माणगाव तालुकाही याला अपवाद नाही. तालुक्यातील वडपाले गावात हंडाभर पाण्यासाठी महिलांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वडपाले गाव वसले असून, गावात जवळपास २०० घरे असून हजार ते अकराशे लोकसंख्या आहे. या गावातील अनेक पिढ्यांचा वेळ पाणी भरण्यातच गेला आहे. कारण गेल्या ७० वर्षांत गावात एकही पाणी योजना पोहोचलेली नाही. लहान मुलांपासून त्यांच्या आजीपासून सर्व जण हंडा घेऊन मैलोन्मैल पायपीट करीत असल्याचे दृश्य सध्या गावात पाहायला मिळत आहे.
जानेवारी महिना उजाडला की, गावातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. घरात लहान मुले, वयोवृद्ध असले तरी पाण्यासाठी सर्वांचीच ससेहोलपट होताना दिसते. गावातील मुलांच्या शिक्षणाकडेही अनेकदा दुर्लक्ष होते. कारण एकच, पाणी!
पाणी आणण्यासाठी गावातील लोकांना कायम वर्दळीचा असलेला मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्ग ओलांडून जावे लागते. त्यानंतर पुढे असलेल्या कोकण रेल्वेमार्गावरून पायपीट करावी लागते. या ठिकाणी रेल्वे फाटक असले तर कायम भीतीच्या छायेतच पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो.
निवडणुका आल्या की, या गावात खासदार, आमदार, नेते मंडळी येतात. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पक्षांचे नेते येतात आणि आश्वासन देतात. महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरणार असल्याची खोटी आश्वासने देतात. मात्र, गेल्या ७० वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीने गावात नळपाणी योजना आणण्यासाठी प्रयत्न केलेले दिसत नाहीत. त्यामुळे आता गावातील लोक स्थलांतराच्या विचारात आहेत.
२५ वर्षांपूर्वी गावात गोरेगाव-देवळी ३२ गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, या योजनेतील शेवटचे गाव वडपाले. त्यामुळे कधी भारनियमन, तर कधी जलवाहिनी फुटली, तर कधी कुठे वॉलला गळती लागल्याने गावात पाणी कधी पोहोचलेच नाही. पाण्याच्या मागे धावण्यात आयुष्य गेले मात्र अजूनही ग्रामस्थांची पिण्याची पाण्याची प्रतीक्षा संपलेली नाही.
गेल्या ३० वर्षांपासून दुपार, असो वा सायंकाळ, दोन ते तीन कि.मी. पायपीट करून पाणी भरावे लागते. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. भर दुपारी, रात्री घरकामातून वेळ मिळेल, तेव्हा पाण्याच्या मागे धावावे लागते, त्यामुळे गावातील महिला वारंवार आजारी पडत आहेत. निवडणुका आल्या की नेतेमंडळी येतात आणि खोटी आश्वासने देतात.
- शांता मनवे,
स्थानिक महिला
१२ वर्षांची असताना लग्न होऊन या गावात आले. आज त्यालाही ७० वर्षे झाली. या ७० वर्षांत पाण्यासाठी काय हाल झाले ते आमचे आम्हालाच माहीत. हायवे आणि रेल्वे फाटक पार करून रात्र असो वा दिवस, आम्हाला पाणी आणावे लागते. अख्खे आयुष्य पाण्यामागे गेले आहे.
- पार्वतीबाई शिंदे,
स्थानिक वृद्ध महिला