दांडकातकरवाडी पाण्यापासून वंचित; हंडाभर पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 10:46 PM2020-02-06T22:46:23+5:302020-02-06T22:46:46+5:30
आदिवासींचे हाल
पाली : सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीत येणाºया दांडकातकरवाडीत अनेक वर्षांपासून नागरिक सेवा सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. जीवनावश्यक असणाºया पिण्याचे दुर्भिक्ष असल्याने येथील नागरिकांचे हाल होत आहेत.
दांडकातकरवाडी अदिवासीवाडीत पाण्याची अनेक वर्षांपासून टंचाई होती. ही पाणीटंचाईला दूर व्हावी म्हणून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये १७ लाख ५४ हजार ९७३ रुपयांची योजना राबवण्यात आली. या योजनेचे काम पूर्ण होऊन तीन-चार वर्षे झाली आहेत; परंतु आजतागायत पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. दांडकातकरवाडीतील ग्रामस्थ आजदेखील पाण्याच्या प्रतीक्षेत आहे.
दांडकातकरवाडीवर नळपाणीपुरवठा योजना राबवूनही गावाची तहान भागत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तरीही येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी महिलांना, तरुणांना, डोंगर उतरून हातपंपावरून पाणी आणावे लागत आहे.