सिकंदर अनवारेदासगाव : महाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचा प्लास्टिक आणि रासायनिक वापराचा कचरा महाड औद्योगिक परिसरातील भंगार गोडाऊनमध्ये पडून आहे. ज्या औद्योगिक पोलीस क्षेत्रात हे भंगार अड्डे येतात त्या भंगार गोदामांवर औद्योगिक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रासायनिक वापरातील कचरा हाताळणाऱ्या परप्रांतीय तरुणांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भंगार अड्ड्यांवर रासायनिक वापरातील टाक्या आणि इतर धातूचे तोडकाम केले जात असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.
महाड औद्योगिक परिसरात असलेल्या कंपन्यांचे भंगार मोठ्या प्रमाणात उचलणारे ठेकेदार महाडमध्ये आहेत. महाड औद्योगिक क्षेत्रातील हे भंगार यापूर्वी एमआयडीसीमधील काही विविध प्लॉटवर साचवले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत भंगार गोदामांवर झालेल्या दुर्घटनांमुळे हे अड्डे आता औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत गेले आहेत. महाडमध्ये देशमुख कांबळे, जिते, टेमघर, इसाने कांबळे, राजेवाडी या ग्रामपंचायतींच्या हद्दीत भंगार गोडावून उभे केले आहेत. स्थानिक पुढारी आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने बिनदिक्कत कोणत्याही परवानगीविना हे भंगार गोडाऊन उभे केले आहेत. विशेष म्हणजे भंगार गोळा करणारे ठेकेदारच कंपन्यांचे खराब रसायन, प्लास्टिक कचरा उचलून एकत्रित करून ठेवत आहेत. अनेक वेळा या भंगार गोडाऊनमध्ये अपघातदेखील झाले आहेत. मात्र, तरीदेखील स्थानिक प्रशासन यावर कोणतीच कार्यवाही करताना दिसून येत नाही.
महाड एमआयडीसीमध्ये असलेल्या कंपन्या या रासायनिक उत्पादन करणाऱ्या आहेत. यामुळे महाड तालुक्याचे आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात परिसरातील भंगार गोडाऊनमुळे गावाचे होणारे नुकसानदेखील अधिक आहे. या ठिकाणी साचवले जाणारे रसायन हे ऐन पावसाळ्यात पाण्यात सोडून देणे किंवा तेथील ड्रममधून होत असलेल्या गळतीने खराब रासायनिक द्रव्य पावसाच्या पाण्याबरोबर गटारात मिसळत आहे. मुळातच कंपन्यांतील गंजलेले लोखंड, सामान, इतर धातूचे सामान एकत्रित करून ते मुंबई किंवा अन्य ठिकाणी रिसायकलकरिता पाठवणे हा व्यवसाय भंगार गोडावून मालक करत असतात. या भंगार मालाबरोबर आता खराब प्लास्टिक पिशव्या, रासायनिक पावडरच्या पिशव्या, कंपनीतील प्लास्टिक कचरादेखील हे भंगार गोडावून मालक उचलत आहेत. या पिशव्या मोठ्या प्रमाणात साचवून ठेवल्याने त्यातील रासायनिक पावडर, द्रव्य तेथील जमिनीवर पडून तिथेच मुरत आहे. यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या शासनाने प्लास्टिकबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि कारवाई सुरू केली आहे. महाड एमआयडीसीमधील कंपन्या त्यांच्या ताब्यातील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट न लावता या भंगार गोडाऊन मालकांना उचलण्यास भाग पाडत आहेत. हा कचरा उचलला तरच भंगार दिले जात आहे. यामुळे हे भंगार गोडाऊन मालक हा प्लास्टिक कचरा उचलत आहेत. मात्र, या प्लास्टिक काचऱ्याचे आता करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक ग्रामस्थांना मात्र या कचऱ्याचा त्रास होत आहे. मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा गोळा केला जात असल्याने त्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना ती होत नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळदेखील या भंगार अड्ड्यांवर असलेल्या खराब रासायनिक द्रव्य आणि प्लास्टिक कचऱ्यावर कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे.
धातूची साधने तोडण्यासाठी केला जातोय घरगुती सिलिंडरचा वापर या भंगार गोदामांमध्ये विविध प्रकारचे लोखंडी पाइप, टाक्या आदी मोठ्या प्रमाणात साठवले जाते. ही धातूची साधने मुळातच रासायनिक वापरातील आहेत. यामुळे यामध्ये कोणते रसायन होते किंवा ते कसे हाताळावे याचे ज्ञान या काम करणाऱ्या तरुणांना नसते. यामुळे अनेक वेळा तोडकाम करताना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय याकरिता घरगुती सिलिंडरदेखील वापरला जातो. मात्र, स्थानिक पोलीस प्रशासन आणि प्रदूषण मंडळाच्या दुर्लक्षामुळे ही कामे बिनदिक्कत सुरू आहेत. पोटाची खळगी भरण्यास आलेल्या परप्रांतीय तरुणांना दिवसाचा रोज कसा सुटेल याची चिंता असते. यामुळे मिळेल ते आणि सांगेल ते काम हे तरुण करत आहेत. हाताला लागणाऱ्या रासायनिक कचऱ्याचा होणारा दुष्परिणाम त्यांना भुकेपोटी जाणवत नाही. मात्र, या साऱ्या सुरक्षेच्या बाबींकडे कामगार आयुक्त, स्थानिक पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र डोळेझाक करत आहे.
घरगुती सिलिंडर वापर किंवा असुरक्षित भंगार तोडकाम केले जात असल्यास प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करू. - पंकज गिरी, पोलीस निरीक्षक, महाड औद्योगिक पोलीस ठाणे
यापूर्वी आपण तक्रारी झाल्यानंतर पंचनामा केला होता, मात्र लगेचच संचारबंदी लागू झाल्याने कार्यवाही करता आली नाही, ग्रामपंचायतीकडून भंगार गोदामांना कोणतीच परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे लवकरच कार्यवाही केली जाईल. - सुरैया अकबर सावंत, सरपंच, राजेवाडी