म्हसळा : दिघी-माणगाव रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. त्या अनुषंगाने मेंदडी येथे रस्त्याचे रुंदीकरण आणि पुलाचे काम सुरू आहे. हा रस्ता आणि पुलालगत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने रस्त्याचे काम पाहता पुलाची उंची वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे परिसरातील घरांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच रस्त्याची उंची भराव टाकून वाढवण्यात येणार असल्याने या भरावामुळे सुद्धा घरांना धोका निर्माण होणार आहे. याबाबत मेंदडी येथील ग्रामस्थांनी भीती व्यक्त के ली असून, तसे निवेदन तहसीलदार तसेच पोलीस ठाण्यात दिले आहे.
या रस्त्याचे काम करताना मेंदडी शिवाजीनगर, क्रांतीनगर, गणेश मंदिर, मुस्लीम कब्रस्तान व ग्रामपंचायतीलगत पुलाचे बांधकाम सुरू आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कोणतीही बाधा येऊ नये, म्हणून काम सुरू होण्यापूर्वी उपविभागीय अधिकारी, तत्कालीन अधिकारी पवार, म.रा.र.वि.म.चे कार्यकारी अभियंता निफाडे, पोलीस निरीक्षक, तहसीलदार गावातील रहिवाशांची बैठक झाली होती. त्यानुसार सर्वांना सोयीस्कर पडेल, असे काम करण्याचे अधिकार संबंधित ठेकेदाराला दिले होते; परंतु प्रत्यक्षात काम करताना गावातील कोणताही रहिवासी तसेच ग्रामपंचायत यांना विश्वासात न घेता ठेकेदाराने काम सुरू केले. तसेच रस्त्यालगत घरांना जोडण्यात आलेली विद्युत पोल, नळ कनेक्शन लाइन, गटारे तोडण्यात आली. त्यामुळे रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तरी याबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सर्व समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी मेंदडी ग्रामस्थांकडून होत आहे.
सद्यस्थितीत या रस्त्याच्या कामाला स्थगिती देऊन प्रथम समस्यांचे निराकरण करावे, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना महेश धर्मा पाटील, महादेव धुमाळ, शांताराम भगत, चांग्या पाटील, राजू पाटील, नारायण डोळकर, सुनंदा पाटील आदीसह इतरग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.भविष्याच्या दृष्टिकोनातून या महामार्गाच्या कामाला काही विरोध असण्याचे कारण नाही; परंतु आमची रस्त्यालगत असणारी घरे मोठ्या प्रमाणात बाधित होत असून, रस्त्याचे काम करणारी यंत्रणा मनमानी करून आपले काम पुढे ढकलत आहे. रस्त्यामुळे भविष्यात उद्भवणारे धोके व स्थानिकांच्या समस्या याकडे प्रशासनाने लक्ष घालावे. अन्यथा यापुढे रहिवाशांच्या माध्यमातून आंदोलन छेडले जाईल.- महेश धर्मा पाटील, सदस्य-तालुका समन्वय समिती