‘कर्नाळ्याचे’ अस्तित्व धोक्यात
By admin | Published: July 10, 2015 12:14 AM2015-07-10T00:14:22+5:302015-07-10T00:14:22+5:30
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र सध्या राज्यात पाहावयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्लाही याला अपवाद राहिलेला नाही
वैभव गायकर पनवेल
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र सध्या राज्यात पाहावयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्लाही याला अपवाद राहिलेला नाही. कर्नाळा किल्ल्यावरील सुळक्याला सध्या चिरा पडत असल्याने किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वातावरणाच्या बदलामुळे हे परिणाम होत आहेत.
प्राचीनकाळी पनवेल व बोर घाटातून मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत होता. कर्नाळावर देवगिरी यादवांचे १२४८ ते १३१८ पर्यंत राज्य होते. किल्ल्याचे बांधकाम नक्की कोणी केले, याचा नेमका पुरावा नसला तरी यादवांनीच तो बांधला असल्याचे बोलले जाते. निजाम, मराठे, पोर्तुगीज या सर्वांच्या इतिहासाचा साक्षीदार हा किल्ला आहे.
१८१८ पर्यंत क्रांतिवीर वासुदेव बळंवत फडके यांचे आजोबा कर्नाळ््याचे किल्लेदार होते. याच कर्नाळ््याच्या इतिहासामुळे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटली.
वृक्षतोड, प्रदूषणामुळे याठिकाणचे प्राणी, पक्षी देखील हळूहळू नष्ट होत गेले तसेच विविध औषधी वनस्पती देखील याठिकाणाहून नामशेष झाल्या आहेत. कर्नाळा किल्ल्यात ‘जैत रे जैत’सारख्या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. यावेळी याठिकाणच्या सुळक्याला लिंगोबाची उपमा देण्यात आली होती. महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटक याठिकाणी गिर्यारोहण(टे्रकिंग)साठी येत असतात.
किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असल्याचे आपणास पाहावयास मिळते तसेच तटबंदी देखील गायब होत चालली आहे. सुळक्याच्या पायथ्याशी १२ पाण्याचे हौद व धान्याची कोठारे आहेत. यापैकी एका हौदाचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो.
किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून योग्य उपाययोजना आजवर होताना दिसून आलेल्या नाहीत. याठिकाणी प्रसिद्ध असलेल्या पक्षी अभयारण्यात पर्यटनप्रेमींपेक्षा संख्या दिवसेंदिवस वाढत आह. कर्नाळा किल्ल्याचे ऐतिहासीक महत्व पाहता याठिकाणच्या बुरुजाच्या संवर्धनासाठी शासनाने तत्काळ पावले उचलावीत यासाठी मी शासनाच्या संबधीत खात्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे गडकिल्ले अभ्यासक विजय खिल्लारे यांनी सांगितले.