श्रीवर्धन शहरामधील गणेश आळीवर दरड कोसळण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:38 PM2019-08-05T23:38:25+5:302019-08-05T23:39:22+5:30
नगरपालिकेची प्रतिबंधात्मक उपाययोजना ; ११ जीर्ण इमारतींना नगरपालिके च्या नोटिसा
श्रीवर्धन : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पावसाचे जोरदार पडसात सर्वत्र उमटत आहेत. श्रीवर्धन शहरातील गणेश आळीच्या उत्तर विभागास दरडीचा धोका निर्माण झाला आहे तसेच श्रीवर्धन शहरातील ११ जीर्ण झालेल्या इमारतीच्या मालकास नगरपालिकेने नोटीसा बजावल्या आहेत.
१ आॅगस्टपासून श्रीवर्धन तालुक्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली त्यामुळे २ आॅगस्टच्या रात्री गणेश आळीतील डोंगराळ भागावरील दरड कोसळली. हे वृत्त समजल्यानंतर श्रीवर्धन शहराचे नगराध्यक्ष ,तहसीलदार,मुख्याधिकारी, अभियंता यांनी समक्ष जाऊन दरड प्रवण क्षेत्राची पाहणी केली आहे. गणेश आळीत सुमार १५० च्या जवळपास लोकांची वस्ती आहे. त्यापैकी ७ ते ८ घरांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या आपत्तीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाने संबंधित दरड प्रवण क्षेत्रातील लोकांसाठी श्रीवर्धन नगरपरिषदेची शाळा नंबर १ व पर्यटन निवासाची वास्तू तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उपलब्ध केली आहे. परंतु दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही ही चिंतेची बाब असून नगरपालिका प्रशासनाकडून जनतेला सहकायाचे व सुरक्षेचे आव्हान करण्यात येत आहे. श्रीवर्धन शहरातील जीर्ण अवस्थेतील ११ निरमनुष्य इमारतीस नगरपालिकेकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, त्यामध्ये मधला कोळीवाडा, मुकादम भाट, वेताळ पाखाडी, चौकर पाखाडी, साळीवाडा, शिवाजी चौक , सिद्धार्थ नगर, ओजाळे पाखाडी, वरचा जीवना व रफी अहमद किडवई मार्ग येथील इमारतीचां सामावेश आहे. नगरपालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
श्रीवर्धन नगरपालिका गणेश आळीतील जनतेच्या सोबत आहे. नगरपालिकेने त्यांच्या सुरक्षेचे दायित्व स्वीकारले असून
दरड प्रवण क्षेत्रातील लोकांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
- नरेंद्र भुसाने, नगराध्यक्ष, श्रीवर्धन
गणेश आळीतील उत्तर विभागातील ७ ते ८ घरांना दरडीचा धोका आहे. गेल्या वर्षीच्या पावसात सुद्धा संबंधित घरांना काही स्वरूपात नुकसान झाले होते त्यामुळे संबंधित लोकांना आर्थिक फटका पोहोचलेला आहे. तरी यावर्षीच्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गणेश आळीतील लोकांनी कुठलाही धोका पत्करू नये जेणेकरून त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल
- अनंत गुरव, नगरसेवक, श्रीवर्धन
दरड प्रवण क्षेत्रातील लोकांच्या सुरक्षतेची काळजी घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना केली आहे. नगरपालिकेच्या शाळा नंबर एक व पर्यटन निवास तात्पुरत्या स्वरूपात निवाºयासाठी तयार ठेवले आहे. जनतेने दरड समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपालिकेला सहकार्य करावे.
- किरणकुमार मोरे, मुख्याधिकारी