चिरनेरमध्ये गोदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:15 AM2017-07-19T03:15:54+5:302017-07-19T03:15:54+5:30
चिरनेर-भोम परिसरातील एका गोदामाला सोमवारी रात्री १०च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपये किमतीचा कापूस आणि कडधान्य जळून खाक
- लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : चिरनेर-भोम परिसरातील एका गोदामाला सोमवारी रात्री १०च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपये किमतीचा कापूस आणि कडधान्य जळून खाक झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे सहा बंब अविरतपणे प्रयत्न करीत होते. अखेर १५ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आग आटोक्यात आली. आगीत गोदाम पूर्णत: खाक झाले असून सुमारे १० कोटींची मालमत्ता जळून खाक झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, असे उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी सांगितले.
उरण तालुक्यातील चिरनेर-भोम रस्त्यावर पी. पी. खारपाटील कंपनीचे गोदाम आहे. भल्यामोठ्या गोदामात कापूस आणि तूर आदी प्रकारातील कडधान्याचा साठा आयात-निर्यातीसाठी ठेवण्यात आला होता. सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास गोदामाला भीषण आग लागली. ज्वलनशील कापूस आणि कडधान्य आगीच्या भक्षस्थानी पडल्याने आगीने आणखी रौद्ररूप धारण केले. आगीची माहिती मिळताच उरण पोलीस, उरण तहसीलदार आदींनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर मंगळवारी दुपारच्या सुमारास आग आटोक्यात आली. आगीत कापूस आणि कडधान्य जळून भस्मसात असून सुमारे १० कोटी मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाल्याचा, तसेच शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज तहसील कार्यालयाकडून वर्तवला जात आहे. घटनास्थळी पोलीस पथक अधिकाऱ्यांसह तैनात करण्यात आले असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र आव्हाड यांनी दिली.