अलिबाग : सावित्री पुलाच्या महाभयंकर दुर्घटनेनंतर सरकारला अचानक जाग आल्याने त्यांनी राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. धोकादायक पुलांची यादीच सरकारने त्यावेळी सादर केली होती. धोकादायक ठरणारे पूल बंद करून तेथे तातडीने नव्याने पूल बांधण्याच्या वल्गनाही सरकारने केल्या होत्या, मात्र अलिबाग तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या खडताळ पुलाबाबत सरकारने अद्यापही कार्यवाही केलेली नाही. उलट त्याच धोकादायक पुलावरील रस्ता तयार करण्याचे काम जोमाने सुरू आहे. नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात यावे, या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. काम न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.अलिबाग तालुक्यामधील विविध प्रकल्प सरकारने गुंडाळून ठेवले आहेत, तर काही प्रकल्पांचे काम हे अतिशय धीम्या गतीने सुरूआहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई-गोवा महामार्ग, अलिबाग-वडखळ रस्त्याचे चौपदरीकरण, विरार-अलिबाग रेल्वे, अलिबाग-मुंबई रेल्वे मार्ग त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.अलिबाग-मांडवा हा रस्ता मांडवा जेटीवर येणाºया पर्यटकांमुळे जगाच्या नकाशावर पोचला आहे. त्याच मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याच रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे यासाठी सर्वपक्षीयांनी नागरिकांच्या सोबत विविध आंदोलने, मोर्चे, उपोषण, रास्ता रोको करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला होता.सरकारने जन आंदोलनानंतर रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली हे चांगले असले तरी, याच मार्गावर ब्रिटिशकालीन खडताळ पूल आहे. या पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पुलावर जागोजागी झाडे उगवली आहेत, तर काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. याच पुलावरील रस्त्यावर भला मोठा खड्डाही पडला होता. सावित्री पुलावरील दुर्घटनेनंतर राज्यासह जिल्ह्यातील सर्वच ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होेते. त्यानुसार खडताळ पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या आशयाचा फलकही पुलाशेजारी लावला. सा. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.1अहवालाप्रमाणे खडताळ पूल धोकादायक असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचा फलक लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम संपले असे सार्वजनिक बांधकाम विभागाला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. याच खडताळ पुलाला पर्याय म्हणून नवीन पूल उभारणे गरजेचे आहे. परंतु बांधकाम विभागाने नव्याने पूल उभारण्याबाबत कोणतेच प्रयत्न केल्याचे दिसत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस जगदीश घरत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.2नव्याने पुलाचे काम करण्याचे सोडून त्याच धोकादायक पुलावर मात्र रस्ता तयार करण्याचे काम कसे काय करू शकता असा प्रश्न त्यांनी बांधकाम विभागाला विचारला आहे. वाहतुकीसाठी धोकादायक असताना त्याच पुलावरील रस्त्यासाठी जनतेच्या लाखो रुपयांचे का नुकसान करण्यात येत आहे, अशीही विचारणा त्यांनी केली. नव्याने पूल बांधण्याच्या कामाला तातडीने सुुरुवात केली नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
धोकादायक पूल : खडताळ पुलावरील रस्त्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 6:57 AM