नेरळ-कळंब रस्त्यावरील धोकादायक वीज खांब हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:59 PM2019-03-27T23:59:36+5:302019-03-27T23:59:47+5:30
- कांता हाबळे नेरळ : नेरळ-कळंब रस्त्यावर पोशीर गावालगत वरई येथील एका खासगी गृहप्रकल्पाला वीजजोडणीसाठी काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कडेला ...
- कांता हाबळे
नेरळ : नेरळ-कळंब रस्त्यावर पोशीर गावालगत वरई येथील एका खासगी गृहप्रकल्पाला वीजजोडणीसाठी काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कडेला खांब टाकण्याचे काम सुरू केले होते; परंतु ही लाइन अतिविद्युतदाबाची असल्याने भविष्यात या लाइनपासून ग्रामस्थ आणि वाहनचालकांना धोका असल्याने काही ग्रामस्थांनी हे काम करण्यास विरोध दर्शविला होता. त्यानंतर बांधकाम विभाग पनवेल, कर्जत आणि महावितरण कर्जत, पेण कार्यालय तसेच नेरळ पोलीस स्टेशनकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार बांधकाम विभागाने या कामास स्थगिती देऊन तत्काळ हे वीज खांब काढण्यात यावे, असे आदेश दिले होते; परंतु स्थगिती देऊन तीन महिने उलटले तरी हे खांब काढण्यात आले नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली, याची दखल घेऊन मंगळवार २६ मार्च रोजी कंपनीने हे खांब हटविले.
आॅक्टोबर २०१८ मध्ये पोशीर गावाजवळ वीज खांब टाकण्याच्या बेकायदेशीर आणि धोकादायक कामाला सुरुवात करण्यात आली होती; परंतु हे खांब नक्की कशासाठी टाकले जात आहेत याची माहिती मिळत नव्हती. तेव्हा पोशीरमधील काही ग्रामस्थांनी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कर्जत महावितरण यांच्याकडे विचारणा केली असता ते खांब एका खासगी कंपनीसाठी टाकले जात असल्याचे समोर आले; परंतु या पोलवरून अतिविद्युत केबल टाकण्यात येणार होती. तसेच हे पोल रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अंतरावर टाकण्याची परवानगी असताना रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्याने ग्रामस्थांनी हे पोल टाकण्यास विरोध केला होता. या पोलमुळे भविष्यात अपघाताचा धोका निर्माण होणार असल्याने पोशीर ग्रामस्थांनी आक्र मक भूमिका घेतली होती.
या संदर्भात ग्रामस्थांनी नेरळ पोलीस स्टेशन, कर्जत, पनवेल सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत, पेण महावितरण कार्यालयाकडे सदर अनधिकृत आणि धोकादायक कामास स्थगिती मिळावी असे पत्र दिले होते. त्यानुसार ३ नोव्हेंबर २०१८ रोजी बांधकाम विभागाने या कामाची परवानगी व कार्यादेश रद्द केले व हे वीज खांब काढण्याचे आदेश दिले. तीन महिने उलटूनही हे खांब काढले नसल्याने अनेक वेळा पोशीरमधील काही ग्रामस्थांकडून विचारणा केली जात होती; परंतु आठवडाभरात काढण्यात येतील, कंपनीला पत्रव्यवहार केला आहे. कामगार मिळत नाही अशी उत्तरे मिळत होती. त्यानंतर आठवडाभरापूर्वी पुन्हा एकदा ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत बांधकाम विभाग आणि महावितरण कार्यालयाकडे चौकशी करून हे खांब कधी काढण्यात येतील अशी विचारणा के ली. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध के ले होते. तेव्हा या आठवडाभरात हे धोकादायक खांब काढण्यात येतील, असे कर्जत महावितरणकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी हे वीज खांब जेसीबी आणि क्रे नच्या साहाय्याने काढल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून धोका टळला आहे.
‘लोकमत’चे विशेष आभार!
पोशीर रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या पोलसंदर्भात ‘लोकमत’ने सुरु वातीपासून अनेक वेळा बातमी प्रसिद्ध केली असून, अनेक वेळा आवाज उठवून अधिकारी वर्गाची आणि ठेकेदाराची मनमानी समोर आणली होती. ‘लोकमत’च्या या पाठपुराव्याला यश आले असून ग्रामस्थांनी ‘लोकमत’चेही आभार मानले आहेत.