साहसी ट्रेकिंग ठरतेय धोकादायक
By admin | Published: October 13, 2015 02:03 AM2015-10-13T02:03:03+5:302015-10-13T02:03:03+5:30
तरुणाईमध्ये सध्या ट्रेकिंग, साहसी खेळांची क्रेझ वाढली आहे. गड-किल्ले, टेकड्या, डोंगर दऱ्यातून मार्गक्रमण करायचे आणि सेल्फी सोशल मीडियावर तत्काळ अपलोड करायचे
वैभव गायकर, पनवेल
तरुणाईमध्ये सध्या ट्रेकिंग, साहसी खेळांची क्रेझ वाढली आहे. गड-किल्ले, टेकड्या, डोंगर दऱ्यातून मार्गक्रमण करायचे आणि सेल्फी सोशल मीडियावर तत्काळ अपलोड करायचे, हे एक फॅड बनले आहे. मात्र हे फॅड जीवघेणे ठरू शकते, हे गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवरून लक्षात येते.
आठवड्याभरापूर्वी नवीन पनवेलमध्ये राहणारा समरेश मंडल हा २६ वर्षीय तरुण माथेरान येथे ट्रेकिंगसाठी गेला. मात्र परतीच्यावेळी जंगलात रस्ता भरकटल्याने तिथेच अडकून पडला. अशा ठिकाणी बऱ्याचदा मोबाइलला रेंज मिळत नाही. मात्र दैव बलवत्तर म्हणून समरेशचा त्याच्या पालकांशी संपर्क झाला आणि पोलिसांच्या मदतीने त्याची शोधण्यात यश आले. या घटनेनंतर तरु णांमधील ट्रेकिंगची क्रेझ कशी जीवावर बेतू शकते, हे पहायला मिळाले. दिवसभर भटकंती केल्याने चक्कर आल्याने समरेश खाली पडला होता. त्यातच जर मोबाइल बंद पडला असता, अथवा संपर्क झाला नसता तर त्याच्या जीवावरही बेतले असते.
पनवेल परिसरातील सह्याद्रीच्या पर्वत रांगा, खारघरचे पठार, कर्नाळा किल्ला आदी ठिकाणी ट्रेकर्स भेट देत असतात. मात्र अनेकदा उत्साहाच्या भरात चुकीचे मार्गक्र मण करून रस्ता भरकटतात. काही महिन्यांपूर्वी कर्नाळा किल्ल्यातही असाच प्रकार घडला होता. याठिकाणी फिरायला गेलेले एक दोघे रस्ता भरकटले होते. माथेरानसारख्या हिल स्टेशनवर ट्रेकिंगला जाण्यासाठी समरेशने धोदाणी मार्गाचा पर्याय निवडला. मात्र यावेळी पुरेशी सुरक्षा साधनसामग्री त्याने सोबत बाळगली नाही. ट्रेकिंगचा बेत सहसा एकट्याने करू नये, अथवा करीत असल्यास सुरक्षेसाठी चाकू, रोप, टॉर्च, पुरेसे पाणी, खाण्याचे सामान जवळ बाळगण्याचा सल्ला नियमित ट्रेकिंगला जाणाऱ्यांकडून दिला
जातो.