दासगांव : दासगांव खाडीपट्टी विभागातील नागझरी नदीवरील वामणे व तुडील या विभागातील गावांना जोडणारा साकव (छोटा पूल) धोकादायक झाला असून, वामणे गावातील ५३ वर्षीय महिला साकवावरील काँक्रीट शिडी तुटून ३० फूट खोल दरीत कोसळली. ही महिला गंभीर जखमी झाली असून, सध्या या महिलेवर मुंबई येथे उपचार सुरू आहेत. महाड तालुक्यातील वामणे, सापे व तुडील या दोन्ही विभागांतील गावांना जोडणारा साकव अत्यंत धोकादायक बनला आहे. हा साकव जवळपास २० वर्षे जुना आहे. वापर रावढल, वामणे, सापे, नडगाव, तुडील, खुटील, नखण, चांदले कोंड, आंबेवाडी भेलोशी या दोन्ही विभागांतील गावातील ग्रामस्थांना येथून ये - जा करण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून हा नागझरी नदीवरील साकव आहे. या सकवापासून काही अंतरावरच वामणे - सापे रेल्वे स्थानक आहे. तुडील विभागातील येणाऱ्या प्रवाशांना जवळचा असा सकवावरून एकच पायी मार्ग आहे. हा नागझरी नदीवरील साकव जुना झाला असून, त्याची देखरेख केली जात नसल्याने हा साकव धोकादायक झाला आहे.वामणे गावातील रहिवासी गजानन नाकते यांनी दिलेल्या माहितीनुसार, वामणे गाव परिसरातील ३० ते ४० महिला तुडील गावात एका ठिकाणी उत्तरकार्यास शनिवारी गेल्या होत्या. परतीच्या प्रवासामध्ये दुपारीच्या सुमारास साकवावर आल्यानंतर अचानक सकवावर टाकलेला काँक्रीट स्लीपर तुटला व नाकते यांची पत्नी शुभांगी गंभीर जखमी झाली आहे. सोबतच्या महिलांनी शुभांगीला उचलून घरी आणले तेथून महाडमध्ये एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र जखम गंभीर असल्याने डॉक्टरांनी उपचारासाठी मुंबई येथे हालविण्याचा सल्ला दिला.या साकावावर पाच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ लाख ५० हजारांची डागडुजीची कामे करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. मात्र त्यावेळी या सकवाच्या काँक्रीट स्लीपरवर व पायऱ्यांच्या कामावर फक्त ९० हजार रुपये खर्च करण्यात आले होते. त्यावेळी हे काम योग्य प्रकारचे करण्यात आले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्याच्या स्थितीत हा साकव धोकादायक झाला आहे. यावरून प्रवास करताना हालत आहे. तसेच ठिकठिकाणी साकवाचे पोल गंजले आहेत. काँक्रीट स्लीपर तुटत आहेत. या साकवावरून मोठ्या प्रमाणावर नागरिक जात असून, येथून जाताना कसरत करीत आपला जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. (वार्ताहर)
तुडीलचा साकाव धोकादायक
By admin | Published: October 16, 2015 2:23 AM