धापया महाराजांची पालखी उत्सवाला अक्षय्य तृतीयेपासून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:24 AM2019-05-08T02:24:16+5:302019-05-08T02:24:35+5:30
कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव मंगळवारी अक्षय्य तृतीयेपासून सुरू झाला. श्री धापया महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
कर्जत : कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव मंगळवारी अक्षय्य तृतीयेपासून सुरू झाला. श्री धापया महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी धापया महाराजांची पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेला कुस्ती आखाडा रंगणार आहे.
पहाटे सनई वादनाने प्रसन्न वातावरण निर्माण झाले. त्यानंतर श्रींची पूजा करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष महेंद्र चंदने यांच्या हस्ते सपत्नीक लघुरुद्र करण्यात आला. त्यानंतर नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली. सायंकाळी जनार्दन परांजपे, मनोज वरसोलीकर, गणेश शिंदे, लक्ष्मण चंदने आदींच्या मार्गदर्शनाखाली श्री धापया महाराजांची पालखी मिरवणूक निघाली. सायंकाळी जांभिवली - डोणे आदिवासी वाडीतील नारायण पवार आणि सहकाऱ्यांच्या भजन झाले. चाकरमान्यांनी रात्री दर्शनासाठी गर्दी केली होती.
बुधवारी सकाळपासून कुस्त्यांना सुरुवात होते. लहान पहेलवानांच्या कुस्त्या सकाळी रंगतात तर दुपारनंतर मोठ्या पहेलवानांच्या कुस्त्यांची
सुरुवात होते. मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी भागातील पहेलवान येथे येतात.