दासगाव भोईवाडा परिसरात दरडींची भीती कायम
By admin | Published: October 6, 2016 03:38 AM2016-10-06T03:38:09+5:302016-10-06T03:38:09+5:30
महाड महसूल प्रशासनाकडून पावसाच्या सुरूवातीपासूनच दरड कोसळण्याची भीती असलेल्या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले होते.
सिकंदर अनवारे, दासगाव
महाड महसूल प्रशासनाकडून पावसाच्या सुरूवातीपासूनच दरड कोसळण्याची भीती असलेल्या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले होते. मंगळवारी ४ आॅक्टोबर रोजी महाड तालुक्यातील दासगाव भोईवाडा येथे घरापासून काही अंतरावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेला डोंगरावरील मोठा दगड येवून धडकल्याने कंबरेला मोठ्याप्रमाणात दुखापत झाली, उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून २००५ मध्ये दासगावमध्ये दरड कोसळल्यानंतर महसूल विभागाकडून दरडग्रस्त भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी के ला असून प्रशासनावर नाराजी व्यक्त
के ली आहे.
२००५ मध्ये महाड तालुक्यातील काही गावांमध्ये दरडी कोसळून अनेक नागरिकांचे बळी गेले होते, तर अनेक घरे जमीनदोस्त झाली होती. महाड तालुक्यातील दासगाव भोईवाडा या विभागात एक भली मोठी दरड कोसळून अनेक घरे उद्ध्वस्त करत ४८ लोकांंना जीव गमवावा लागला होता. आजपर्यंत गेली ११ वर्षे परिसरातील नागरिक पावसाळा आला की दरड कोसळण्याच्या भीतीने आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत. महसूल प्रशासन पावसाळ्यापूर्वी दरडी कोसळण्याच्या भीतीने येथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होण्याची नोटिसा देऊन जबाबदारी झटकत आहेत.
भोईवाड्यामध्ये जवळपास ३०० घरे असून साधारण १५०० ते १७०० नागरिकांचे वास्तव्य करत आहेत. वारंवार दरडीचे प्रकार घडत आहेत. एकदा या विभागातील इब्राहिम टोळकर यांच्या घरावर मोठा दगड पडला. त्यात भारी नुकसानही झाले, या घटनेनंतर एक ा घरावर मातीचा ढिगारा येऊन अर्धे घर बंद झाले. सलग दोन तीन वर्षे बंदर रोडला लागून असणाऱ्या घरांवर दगड पडत आहेत तर यंदाच्या पावसाळ्यात दासगाव कॉम्रेड आर. बी. मोरे या हायस्कूलच्या मागील बाजूस एका वर्गावर मोठा दगड कोसळून मोठ्याप्रमाणात नुकसान झाले, रात्रीच्या वेळी ही घटना झाल्याने विद्यार्थ्यांचे प्राण बचावले.
मंगळवारी जागृती मिंडे ही महिला कपडे धुण्यासाठी गेली असता दरडीमुळे तिच्या अंगावर दगड कोसळून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वारंवार या घटना होऊन सुध्दा प्रशासनाकडून पंचनामाखेरीज सुरक्षिततेसाठी कुठलेही ठोस पाऊल उचलले जात नाही. जर तशा प्रकारचे पाऊल उचलले गेले असते तर या महिलेचा जीव वाचला असता अशी संताप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. वेळीच जर नागरिकांच्या सूचनांकडे लक्ष दिले असते तर कदाचित महिलेचा मृत्यू झालाच नसता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
२००५ मध्ये दरडी कोसळून ज्या लोकांची घरे गेली त्यांनी अजूनही घर बांधण्यासाठी प्रशासनाकडून पैसे देण्यात आलेले नाहीत. कुठली सोयही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. प्रशासनाकडून काही वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील दरडग्रस्त ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरासाठी तात्पुरती निवारा शेड उभारण्यासाठी ९५ कोटी ८७ लाखांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता मात्र तोही अद्याप धूळखात पडला आहे. संरक्षण भिंत व डोंगर सपाट करण्याचा निष्कर्ष २००५ सालामध्ये दासगावमध्ये दरड कोसळल्यानंतर प्रशासनाकडून करण्यात आला. पावसाळ्यात नागरिकांना स्थलांतराशिवाय काही पर्याय नाही, मात्र याठिकाणच्या बऱ्याचशा नागरिकांनी ग्रामपंचायतीमार्फत दगड व माती थांबविण्यासाठी संरक्षण भिंत प्रशासनामार्फत करून मिळावी व डोंगर भाग सपाट करावा अशी मागणी वारंवार केली आहे, मात्र याकडे प्रशासन अद्यापही लक्ष न देता नोटिसांवरच समाधान मानत आहे.