खाडीवर दासगाव ते गोठे पूल बांधावा; खासदार सुनील तटकरे यांना दिले निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 11:45 PM2019-12-08T23:45:53+5:302019-12-08T23:45:57+5:30
शेकडो वर्षांपासून दासगाव बंदर या ठिकाणी दासगाव आणि गोठे या दोन गावांना जोडणारा सावित्री खाडीवरील पूल बांधण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून जोर धरल्याचे दिसून येत आहे.
दासगाव : शेकडो वर्षांपासून दासगाव बंदर या ठिकाणी दासगाव आणि गोठे या दोन गावांना जोडणारा सावित्री खाडीवरील पूल बांधण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून जोर धरल्याचे दिसून येत आहे. या पुलाच्या उभारणीसाठी महाड खाडीपट्ट्यातील नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्या सुतारवाडी कार्यालयात जाऊन एक निवेदन दिले.
दासगाव हे पूर्वापारपासून बंदर आहे. इतर राज्यातून येणाऱ्या तसेच जाणाºया नागरिकांचे एक महत्त्वाचे ठिकाण होते. गाडीमार्ग कमी होता, त्या वेळी या बंदरातून मोठ्या प्रमाणात लॉन्चने नागरिक ये-जा करीत असत. बॅ. ए. आर. अंतुले यांनी मंत्रिपदाच्या काळात टोळ, आंबेत आणि दादली या तीन पुलांची उभारणी केली. त्यामुळे खाडीपट्टा आणि रायगड ते रत्नागिरी दोन्ही जिल्हे जोडले गेले आणि या पुलांमुळे एक सोईस्कर मार्ग तयार झाला.
आजही खाडीपट्ट्यात जाण्याचा विषय आला, तर महाडमार्ग आणि आंबेत मार्ग असे महामार्गावरून दोन मार्ग अवलंबावे लागतात. खाडीपट्ट्यातील नागरिकांना हे दोन्ही मार्ग लांबचेच आहेत. खाडीपट्ट्यात आजही शेकडो गावांचा समावेश असून, जवळपास ५० हजारांच्या वरती लोकसंख्या आहे. सध्या खाडीपट्ट्यात जाण्यासाठी महामार्गावरून जवळचा मार्ग दासगाव ते गोठे होडी मार्ग आहे. आजच्या वेळी हा होडी मार्ग कधी बंद तर कधी सुरू असतो.
मात्र, रात्रीच्या वेळी हा मार्ग बंद असतो. त्यामुळे महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील नागरिकांची मोठी हेलपाटणी होते. खासदारकीच्या निवडणुकीच्या काळात अनेक नागरिकांनी खा. सुनील तटकरे यांना दासगाव ते गोठे या दोन गावांना जोडण्यासाठी सावित्री खाडीवरील पूल भविष्यात बांधण्यात आला तर त्याचे काय महत्त्व आहे हे निदर्शनास आणून दिले होते.
खाडीपट्ट्यातील प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस रिहान फैरोजखान देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोठे ग्रामस्थांनी खा सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी कार्यालयात जाऊन निवेदन दिले.
पुलाचे महत्त्व
या पुलाच्या उभारणीनंतर खाडीपट्ट्यातील तसेच रत्नागिरी विभागातील शेकडो गाव मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला येऊन मिळणार आहेत. खाडीपट्ट्यातील नागरिकांना वीर रेल्वे स्थानकही जवळचे स्थानक होईल. तसेच म्हाप्रल-पंढरपूर आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग एकमेकाला जोडले जातील.
रत्नागिरी तसेच कोकणच्या तळापर्यंतच्या नागरिकांना एक जवळचा पर्यायी मार्ग तयार होईल. तर नातूनगर, विन्हेरे, नडगाव रावढल, दासगाव हा एक नवीन पर्यायी मार्ग तयार होणार असून नातूनगर ते दासगाव या पर्यायी मार्गामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरचे २० (वीस) कि.मी.चे अंतर कमी होईल.
बॅ. ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिपदाच्या काळात बांधलेले दादली, टोळ आणि आंबेत हे तिन्ही पूल कमकुवत झाले आहेत. आज या तिन्ही पुलांची डागडुजी झाली तरी ते खात्रिलायक बनणार नाहीत. त्यामुळे भविष्यात दासगाव ते गोठे सावित्री खाडीवरील पूल हा एक नवीन पर्यायी मार्ग असणार आहे.