दासगाव, केंबुर्लीमध्ये भीषण पाणीटंचाई, १२ ते १३ वर्षांपासून समस्या कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 04:45 AM2019-04-06T04:45:09+5:302019-04-06T04:45:37+5:30
ग्रामस्थ त्रस्त : व्हॉल्व्हवर काढावी लागते रात्र
सिकंदर अनवारे
दासगाव : दासगाव आणि केंबुर्लीमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दासगावमधील नवीन वसाहतीची विहीर चौपदरीकरण कामात गेल्यानंतर उरलेल्या नळ पाणीपुरवठ्याचा स्रोत सध्या बंद झाल्याने या वसाहतीतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्याचप्रमाणे केंबुर्ली गावातील होळीचा माळाची हीच अवस्था झाली असून याठिकाणी देखील पाण्याचा कोणताच स्रोत उपलब्ध नसून दासगाव वहूर नळ पाणीपुरवठ्याला जाणाऱ्या पाइपलाइनवरील व्हॉल्व्हवर रात्री बसून थेंब थेंब पाणी जमा करण्याची वेळ आली आहे. मात्र, शासनाने या दोन्ही ठिकाणचा विचार करत विहिरींची व्यवस्था करून देणे गरजेचे आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी विहिरी किंवा बोअरवेल देण्यात आल्या. मात्र, या दोन्ही ठिकाणी शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
दासगाव आणि केंबुर्ली या दोन गावांना कोथुर्डे धरणातून नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. नेहमी वीज बिल तक्रार, कोथुर्डे धरणातून सोडण्यात येणारे पाणी अशा अनेक समस्यांना या दोन गावांना सामोरे जावे लागते. ऐन उन्हाळ्यात कोथुर्डे धरणाची पातळी घटते. याचाच फटका दोन गावांना बसतो. सध्याच्या परिस्थितीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेली दासगावमधील नवीन वसाहत याठिकाणी जवळपास ८० घरांचे वास्तव्य आहे. यांना महाडवरून येणारा नळ पाणीपुरवठा तसेच एक विहीर हाच आधार आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे विहीर बाधित झाल्यानंतर शासनाने विहिरीचा मोबदला दिला असला तरी कोणत्या ठिकाणी विहीर घ्यायची याचा निर्णय झाला नाही. या वसाहतीची पाण्यासाठी एक बाजू लंगडी झाली आहे. त्याचबरोबर कोथुर्डे धरणातून सुटणारे पाणी हे सध्या नदीवर बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. यामुळे धरणातून सुटणारे पाणी बंद आहे. जॅकवेल कोरडी झाली आहे. यामुळे दासगावचा नळपाणी पुरवठा बंद आहे. याचा फटका मात्र या वसाहतीला बसला असून याठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे महाड तालुक्यातील केंबुर्ली गावात अवस्था हीच निर्माण झाली आहे. या गावाचा देखील पाणीपुरवठा याच कोथुर्डे धरणातून केला जात असला तरी वारंवार पाणी समस्या, वीज बिल समस्या निर्माण होत असल्याने सध्या या गावाचा डिसेंबरपासून पाणीपुरवठा बंद आहे. अंतर्गत काही पाण्याचे स्रोत असले तरी संपूर्ण केंबुर्ली गावाला पाण्याचे कोणतेच साधन उपलब्ध नाही. दासगाव नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी चालू असल्यानंतर गाव हद्दीतून जाणाऱ्या पाइपलाइनमधून थेंबथेंब करून रात्र घालवून संपूर्ण गाव पाणी भरण्याचे कष्ट करत आहेत.
१२ ते १३ वर्षांपासून समस्या कायम
दासगाव नवीन वसाहतीलाही पाण्याची समस्या गेल्या १२ ते १३ वर्षांपासून भेडसावत आहे. त्याचप्रमाणे केंबुर्ली गावाला देखील ही समस्या गेली २0 वर्षांपासून भेडसावत आहे. २0 वर्षांत कमीतकमी तीन वेळा निवडणुका झाल्या असल्या तरी या दोन्ही ठिकाणी प्रशासन असो किंवा राजकीय लोकप्रतिनिधी असून यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. महाड तालुक्यातील अनेक गावे आणि वाड्या डोंगराळ भागांमध्ये असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर अनेक समस्या आजही भेडसावत आहेत.
सर्वात गंभीर समस्या पिण्याच्या पाण्याची असून दरवर्षी टँकरची संख्या कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो, त्याचबरोबर तालुक्यांमध्ये पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या कमी दाखविली जाते. प्रत्यक्षामध्ये आजही अनेक गावे तहानलेले आहे. या गावांना टँकरने पाण्याचा पुरवठा करताना अनेक निकष लावले जातात. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे तालुक्यांतून १३ टँकरची मागणी असल्याची माहिती या विभागाचे गायकर यांनी दिली.
२०१८-१९ टंचाई कार्यक्रमांतर्गत तालुक्यांत २९३ विंधण विहिरींचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी ४९ विंधण विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातील नऊ विंधण विहिरींना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून त्यांची कामेदेखील सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये विन्हेरे बाग आळी, विन्हेरे वरची आळी, विन्हेरे रोहिदास नगर, करंजाडी नटेवाडी, अप्पर तुडील मोहल्ला,वामने नाकातेआळी, नागाव फौजदार वाडी, मोहोप्रे आदिवासी वाडी आणि पारमाची वाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. या बोअरवेल प्रस्तावामध्ये मात्र दासगाव आणि केंबुर्ली ही दोन गावे वगळल्याने या दोन्ही गावातील पाणीटंचाई कायम आहे. यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
केंबुर्ली गावाला नळ पाणीपुरवठा व्यतिरिक्त कोणताही पाण्याचा स्रोत नाही. कोथुर्डे धरणाचे पाणी बंद झाले की केंबुर्लीत भीषण पाणीटंचाई निर्माण होते. सध्या भीषण पाणीटंचाई असून प्रशासनाने यावर लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन विहिरी बांधून देणे किंवा बोअरवेल देणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत आहे. तात्पुरता टँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.
- सादिक घोले, सरपंच केंबुर्ली