दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर
By Admin | Published: October 9, 2016 02:53 AM2016-10-09T02:53:12+5:302016-10-09T02:53:12+5:30
दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर विशाल पाटील दीर्घकालीन रजेवर गेल्याने रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पाटील यांच्या रजेबाबत वरिष्ठांना
दासगाव : दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर विशाल पाटील दीर्घकालीन रजेवर गेल्याने रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पाटील यांच्या रजेबाबत वरिष्ठांना काहीही माहिती नाही. यापूर्वीही असे प्रकार घडल्याने पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रुग्णांकडून होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जवळपास २२ गावांच्या ग्रामस्थांची वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. अपघातानंतर बहुतांश रुग्णांना प्रथम याच आरोग्य केंद्रात आणले जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे जिल्हा आणि तालुका प्रशासन मात्र दुर्लक्ष करून संबंधित डॉक्टरांवर केवळ कारवाईचे कागदी घोडे नाचवत आहे. येथील वैद्यकीय अधिकारी विशाल पाटील हे ऐन गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारचा रजेचा अर्ज न देता रजेवर गेले होते.
गणेशोत्सवामध्ये महामार्गावरील होणारी वाहतूककोंडी आणि अपघाताची शक्यता या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रजेवर न जाता दिलेले केंद्र संभाळायचे होते, मात्र डॉ. पाटील यांनी हा आदेश न जुमानता येथून निघून गेले
होते. ही बाब एका अपघातानंतर लक्षात आली होती. त्या वेळीदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र कोणतीच कारवाई न झाल्याने डॉ. पाटील पुन्हा कामावर रुजू झाले होते. आता सोमवार, ३ आॅक्टोबरपासून पाटील रजेवर आहेत. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता डॉ. पाटील यांचा रजेचा अर्ज आला नसल्याचे सांगण्यात आले.
दासगावमधील रामा निर्मळ यांचा मुलगा सूरज निर्मळ याला विंचूदंश झाल्यानंतर त्याला दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते.
मात्र डॉक्टर जागेवर नसल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे मुलाला खाजगी रुग्णालयात न्यावे लागले. घटनेनंतर ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी केली असता डॉ. पाटील रजेवर गेल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने दिले. या ठिकाणी अन्य कोणताही सह डॉक्टर उपलब्ध नसल्याने गत सोमवारपासून रुग्णांचे हाल होत आहेत.
शासकीय सेवा असूनदेखील ग्रामीण भागातील रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. (वार्ताहर)
डॉ. विशाल पाटील विनापरवानगी अनधिकृतपणे रजेवर गेले आहेत. त्यांना रजेवर न जाण्याचे सांगण्यात आले होते. या रजेचा पगार देण्यात येणार नसून त्यांच्यावर यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल. या ठिकाणी दुसऱ्या डॉक्टरांची सोय करण्यात येईल.
- शैलेश घालवडकर,
सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी
दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने या ठिकाणी अपघातातील रुग्णांना उपचारासाठी जवळचे आरोग्य केंद्र आहे. विभागातील गरीब जनता या आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या संख्येने उपचार घेत आहे. डॉक्टर गैरहजर असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. प्रशासनाने यांची गांभीर्याने दखल घ्यावी व या ठिकाणी ताबडतोब डॉक्टरांची सोय करण्यात यावी अन्यथा दासगाव ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील.
- पांडुरंग सूर्यकांत निवाते,
ग्रामस्थ, दासगाव