दासगाव : दासगावच्या हद्दीत भरवस्तीत बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रसायनाने भरलेला टँकर पलटी झाला. या अपघातानंतर टँकरला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. यामुळे संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांना उलटी, चक्कर, घशाला खवखव, श्वसनाचा त्रास जाणवू लागला. या अपघातामध्ये टँकर चालकासह दासगाव येथील दोन ग्रामस्थ असे तिघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.मुंबई-गोवा महामार्गावर २८ डिसेंबरला सकाळी ८ च्या सुमारास दासगाव गावच्या हद्दीत उतारावर महाड औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी आॅरगॅनिक्स या कारखान्याच्या मुंबईतील चेंबूर या ठिकाणाहून अॅसिडिक अॅसिड घेवून येणारा भरलेला टँकर पलटी झाला. पलटी होताच हा टँकर रस्त्याच्या कडेला कठड्याला धडकला व अर्धा रस्त्यावर व अर्धा रस्त्याबाहेर पलटी झाला. धडकेनंतर दासगावचे दोन ग्रामस्थ सचिन पयेलकर (२८) व संदेश जाधव (४०) हे दोघेजण दगडाच्या माराने, तसेच टँकरचालक राजाभान गणेश सकिन (रा. उत्तर प्रदेश )असे तिघे जण जखमी झाले. अपघातानंतर टँकरला गळती सुरू झाली. टँकरमधील रसायन १० दुकाने तसेच आयसीआयसीआय बँक, पोस्ट आॅफिस तसेच दवाखाना यांच्या समोरील रस्त्यावरून वाहण्यास सुरू झाले. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या घरातील नागरिकांना विविध त्रास होण्यास सुरुवात झाली. अपघातानंतर जवळपास एक तास या ठिकाणी तालुक्यातील कोणतीही शासकीय यंत्रणा पोहचू शकली नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती.अॅसिडिक अॅसिडच्या त्रासाची तीव्रता जाणवताच जवळच असलेली जिल्हा परिषदेची मराठी शाळा व हायस्कूल यांना सुटी देण्यात आली. तर आयसीआयसीआय बँक, पोस्ट आॅफिस हे देखील बंद ठेवण्यात आले होते. दवाखाना व हॉटेल, छोट्या १० ते १२ टपऱ्या यादेखील दिवसभर बंद होत्या. त्यामुळे परिसरात शुकशुकाट होता. दोन घरांमध्ये अॅसिड शिरल्याने या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्याच्या दोन विहिरींनाही धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)दोन तासांत नियंत्रणअपघाताची माहिती महाड एमएमएचे अध्यक्ष संभाजी पठारे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी सेफ्टीचे अधिकारी सी. डी. देशमुख यांना पाठवून घटनेवर नियंत्रण आणण्याचे काम केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन फायटर तसेच दोन रुग्णवाहिका या ठिकाणी तयार ठेवण्यात आल्या होत्या. दोन तासांनंतर अॅसिडिक अॅसिडवर नियंत्रण आणण्यात महाड फायर फायटर तसेच लक्ष्मी आॅरगॅनिक्स कारखान्याची टीम व सेफ्टी टीम यांना यश आले.तलाठ्यांनी के लानुकसानीचा पंचनामा अपघातानंतर दासगावचे पोलीस हवालदार धनाजी पिंगळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अॅसिड गळत असताना दोन जखमींना या ठिकाणाहून बाहेर काढले. यामुळे परिसरात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. घटनेच्या ठिकाणी महाड तहसीलदार औदुंबर पाटील, नायब तहसीलदार महेंद्र बेलदार, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अमित लाटे, वेसावे यांनी पाहणी के ली.घटनेचे गांभीर्य पाहून अधिकारी येथील वातावरण शांत होईपर्यंत ठाण मांडून बसले होते. अपघातानंतर संध्याकाळपर्यंत या परिसरात नागरिकांना त्रास जाणवतच होता. परिसरातील नुकसानीचे पंचनामे दासगावचे तलाठी संदेश पानसारे यांच्या मार्फत सुरू करण्यात आले. याचा अहवाल लक्ष्मी आॅरगॅनिक्स कारखान्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पानसारे यांनी दिली.
दासगावात रसायनाने भरलेला टँकर पलटी
By admin | Published: December 29, 2016 2:51 AM