श्रीवर्धन : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नाममंत्र घोषणाने रायगड जिल्ह्यासह परिसरातील १२० मंदिरात कोरोनाचे नियमांचे पालन करून उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात आली.
श्रीवर्धन शहरातील पेशवे आळीत असलेल्या दत्त मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शन घेण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने मात्र उत्साहात भाविकांनी श्रीवर्धन शहरात दत्तजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केली. भाविकांनी दत्त मंदिराच्या गाभाऱ्यावर रोषणाई केली आहे. मंदिर परिसर पूर्णतः स्वच्छ करण्यात आला.
दिवसभर मंगलमय वाद्य कमी आवाजामध्ये ध्वनिक्षेपाद्वारे लावण्यात आले. प्रत्येक वर्षी दिवसभर दत्तजयंती उत्सवप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, सद्यस्थितीत कोरोनाचा धोका लक्षात घेऊन, पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमा होतील, या पद्धतीचा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही. सकाळी दत्तमूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले.
मजगावमध्ये दत्तजयंतीवर कोरोनाचे सावट
बोर्ली-मांडला : मुरूड तालुक्यातील मजगावमध्ये दीडशे वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या दत्तजयंती उत्सवावर कोरोनाचे सावट असून सकाळची भिक्षाफेरी अत्यंत साधेपणाने काढण्यात आली होती. मजगाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदत्त मंदिरात यंदा कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अटी, नियम व शर्तींचे पालन करीत सकाळी ६ वा. विधिवत पूजाअर्चा व अभिषेक करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे होणारी भिक्षेची फेरी सकाळी ९ वा. अत्यंत साधेपणाने काढण्यात आली होती. सायंकाळी ६ वा. हभप तुपे महाराज यांचे श्रीदत्त जन्मावर कीर्तन झाले. कोरोनामुळे यंदा दत्तजयंती उत्सवानिमित्ताने भरणारी यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती श्रीमल्हारीनाथ देवस्थानचे ट्रस्टी महेश गोसावी यांनी दिली.